सातारा, सांगलीतील मदत निधी..,‘कोल्हापूर’ला कधी; मे महिन्यापासून प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:58 IST2025-09-22T12:57:54+5:302025-09-22T12:58:25+5:30
जिल्ह्यातील ४६ हजार शेतकऱ्यांचे १७.७३ कोटींचे नुकसान

सातारा, सांगलीतील मदत निधी..,‘कोल्हापूर’ला कधी; मे महिन्यापासून प्रतीक्षा
कोल्हापूर : राज्य शासनाने नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी मदत निधीस मान्यता दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४६ हजार शेतकऱ्यांचे मे व ऑगस्टमधील अतिवृष्टीने १७.७३ कोटींचे नुकसान झाले आहे. त्या निधीला शासन मान्यता कधी देणार? याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
यंदा राज्यात सगळीकडेच पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १७ मेपासून पाऊस सुरू आहे. मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १० हजार २८४ शेतकऱ्यांचे ३ कोटी ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर केला आहे. तोपर्यंत ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने ३६ हजार ५५९ शेतकऱ्यांचे ८८३५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. यामध्ये १४ काेटी २८ लाखांचे नुकसान झाले आहे. दोन्ही पंचनामे करून शासनाला निधीसाठी पाठवले आहेत.
राज्य शासनाने जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. मात्र, कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? याकडे लक्ष लागले आहे.
अशी दिली शासनाने मान्यता..
जिल्हा - बाधित शेतकरी - क्षेत्र हेक्टर -मंजूर निधी
- नांदेड - ७.७४ लाख - ६.४८ लाख - ५५३.४८ कोटी
- परभणी - २.३८ लाख - १.५१ लाख - १२८.३८ कोटी
- सातारा - १४२- २१.६० - ३.२३ लाख
- सांगली - १३,४७५ - ४,०७४ - ७.४५ कोटी
मदत कर्जाला घेता येणार नाही
नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलेल्या मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या कर्ज अथवा अन्य वसुलीत वळती करू नयेत, यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून बँकांना निर्देश द्यावेत, अशा स्पष्ट सूचनाही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी दिल्या आहेत.