खरंच अन्नातून विषबाधा की विषप्रयोगाचा प्रयत्न ?; कोल्हापूर जिल्ह्यात चौघांचा बळी, तपासाचे पोलिसांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:24 IST2024-12-05T18:24:02+5:302024-12-05T18:24:22+5:30

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील मांडरे आणि कागल तालुक्यातील चिमगाव येथे विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्यांसह पाच जणांना आपला जीव गमवावा ...

Really Food Poisoning or Attempted Poisoning; Four killed in Kolhapur district, challenge to police for investigation | खरंच अन्नातून विषबाधा की विषप्रयोगाचा प्रयत्न ?; कोल्हापूर जिल्ह्यात चौघांचा बळी, तपासाचे पोलिसांसमोर आव्हान

खरंच अन्नातून विषबाधा की विषप्रयोगाचा प्रयत्न ?; कोल्हापूर जिल्ह्यात चौघांचा बळी, तपासाचे पोलिसांसमोर आव्हान

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील मांडरे आणि कागल तालुक्यातील चिमगाव येथे विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्यांसह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. मांडरेतील एकजण अत्यवस्थ आहे. या घटना अन्नातील विषबाधेमुळे झाल्या की कोणी घातपाताने विषप्रयोग केला? याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दोन्हीही शक्यता घातक असल्याने यातील वस्तुस्थिती समोर आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मांडरे येथे २० दिवसांपूर्वी मुंगूस चावून दगावलेल्या कोंबडीचे मांस खाल्ल्याचे निमित्त झाले आणि एकाच कुटुंबातील तीन भावंडांसह वडिलांना विषबाधा झाली. यातील वडील पांडुरंग विठ्ठल पाटील (वय ६४) यांचा उपचारादरम्यान आठवड्यापूर्वी मृत्यू झाला. कृष्णात पाटील आणि रोहित पाटील या दोघांचा मंगळवारी (दि. ३) उपचारादरम्यान मृत्यू झाला. लहान भाऊ प्रदीप पाटील याची प्रकृती अत्यवस्थ आहे. पाटील कुटुंबातील कृष्णात पाटील यांची पत्नी गंगा आणि मुलगी ओवी या दोघी सुखरूप आहेत. कौटुंबिक वादातून गंगा हिनेच कुटुंबीयांवर विषप्रयोग केला असावा, असा ग्रामस्थांचा संशय आहे. तशी तक्रारही त्यांनी पोलिसांसमोर केली आहे.

परंतु, त्याबद्दल अजून तरी ठोस पुरावा हाती न आल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू ठेवला आहे. ती मूकबधिर असल्याने चौकशीत पोलिसांना मर्यादा येत आहेत. विषबाधा की विषप्रयोग याचा छडा लावण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.

चिमुकल्यांचा हकनाक बळी

मांडरेतील प्रकरण ताजे असतानाच चिमगाव येथे मुदत संपलेला कप केक खाल्लेल्या चिमुकल्या भावंडांचा मंगळवारी मृत्यू झाला. सुुरूवातीला आईस केक खाल्ल्याची चर्चा होती. नंतर कप केक खाल्ल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे मंगळवारी सकाळी दगावलेल्या मुलाची उत्तरीय तपासणी न करताच त्याच्यावर अंत्यसंस्कार झाल्याने संशय बळावल्याचे पोलिसांनी सांगितले. कप केकमधून विषबाधा झाली असेल तर पोलिस आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना केकचे उत्पादक आणि विक्रेत्यांपर्यंत पोहोचून याचा तपास करावा लागेल. कप केकमधून विषबाधा झाली नसेल तर अन्य कारणांचा शोध घेण्याची गरज आहे.

दोन्ही शक्यता घातक

जेवण आणि कप केकमधून विषबाधा झाली असेल तर त्या खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन तपासणी करावी लागेल. त्याच बॅचमधील कप केकची विक्री रोखावी लागेल. घातपाताने विषप्रयोग झाला असे, तर संशयितांचा शोध घेऊन अमानुष कृत्याबद्दल त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवावे लागेल. दोन्ही शक्यता घातक असल्याने याच्या मुळाशी पोहोचण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.

संशय बळावतोय

मांडरे येथे १५ नोव्हेंबरला मुंगूस चावून दगावलेल्या कोंबडीचे मांस खाल्ल्यानंतर तिघांना त्रास सुरू झाला. चिकन न खाल्लेले प्रदीप पाटील हे दुसऱ्या दिवशी जेवल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला. चिमगाव येथे मुलांनी खाल्लेले कप केक खराब असतील तर याचदरम्यान त्याच बॅचमधील इतर ठिकाणी कप केक खाणाऱ्यांना त्रास झाल्याच्या तक्रारी अद्याप आलेल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये संशय बळावल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवाय हा केक कुणी आणि कोठून आणून दिला? याचा शोध घेतल्यास घटनेचा उलगडा होऊ शकतो.

Web Title: Really Food Poisoning or Attempted Poisoning; Four killed in Kolhapur district, challenge to police for investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.