कोल्हापुरात शिंदेसेनेकडून रस्त्याच्या कामात दहा कोटींचा ढपला, रविकिरण इंगवले यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:46 IST2026-01-06T17:46:31+5:302026-01-06T17:46:46+5:30
स्वाभिमानी कोल्हापूरकर हिसका दाखवतील..

कोल्हापुरात शिंदेसेनेकडून रस्त्याच्या कामात दहा कोटींचा ढपला, रविकिरण इंगवले यांचा आरोप
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यासाठी शंभर कोटींचा निधी आणला म्हणून डांगोरा पिटणाऱ्या शहराच्या शिंदेसेनेच्या आमदारांनी त्यात दहा कोटींचा ढपला पाडल्याचा आरोप उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सोमवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक दहामधील प्रचारसभेवेळी केला. एव्हीएमच्या जीवावर निवडून आलेल्या या महायुतीच्या नेत्यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली स्वत:ची घरे भरण्याचेच काम केल्याची टीकाही इंगवले यांनी केली.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. इंगवले म्हणाले, शहरातील रस्त्यासाठी राज्य सरकारने निधी दिला; परंतु त्यातून निकृष्ट दर्जाचे रस्ते झाले. टक्केवारी ठरल्याशिवाय ठेका कुणाला द्यायचा याचा निर्णय होत नव्हता. ही टक्केवारी ठरली की त्यांच्या कार्यालयातून ठेकेदाराला मंजुरी द्या म्हणून निरोप येत होते.
रोज एक विकास काम काढायचे, त्यासाठी सरकारकडून निधी मंजूर करून आणायचा आणि त्यात टक्केवारी ठरवून स्वत:चे घर भरायचे असेच उद्योग ते आजपर्यंत करत आले आहेत. साधा फटाके विकणारा हा माणूस आज कोट्यवधी रुपयांच्या आलिशान गाडीतून कसा काय फिरतो हे न समजण्याएवढी जनता खुळी नाही, असेही इंगवले यांनी म्हटले आहे.
वाचा: थेट पाइपलाइनमध्ये दोष होता तर आठ वर्षात चौकशीला हात कुणी धरला होता, सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर
ते म्हणाले, आमचीच खरी शिवसेना, आम्ही खरे हिंदुत्ववादी असा दावा हे शिंदेसेनेवाले करतात; परंतु तो खोटा आहे. यांचे हिंदुत्व लबाडीचे आहे. त्यांना विचार, बांधीलकी यांच्याशी कांही देणेघेणे नाही. सत्तेचा वापर करून स्वत:ची घरे भरण्यातच ते पुढे आहेत. अशा पक्षाच्या उमेदवारांना कोल्हापूरची जनता हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. यावेळी प्रताप जाधव, ऋषिकेश इंगवले, मिलिंद पाटील, मोहन साळोखे, बाबा चव्हाण, केदार तिवले आदी उपस्थित होते.
स्वाभिमानी कोल्हापूरकर हिसका दाखवतील..
निवडणुकीच्या अगोदर प्रत्येक पक्षातील लोकांना विविध आमिषे दाखवून त्यांना पक्षात ओढून घेतले म्हणजे यांना पक्ष वाढल्याचे वाटत आहे. परंतु नेते यांच्याकडे आले म्हणून कोल्हापूरची स्वाभिमानी जनता यांच्याकडे आली या भ्रमात त्यांनी राहू नये. तीच जनता अशा प्रवृत्तींना हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही इंगवले यांनी यावेळी दिला.