कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे ८ कोटींचे कमिशन थकले, हक्काची रक्कमही मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:53 IST2025-10-08T18:52:50+5:302025-10-08T18:53:16+5:30
पुरवठा विभागाला निवेदन

कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे ८ कोटींचे कमिशन थकले, हक्काची रक्कमही मिळेना
कोल्हापूर : मोफत धान्यावर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना देण्यात येणारे गेल्या ४ महिन्यांचे ८ कोटींचे अनुदान थकले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही कमिशनची रक्कम मिळावी, आनंदाचा शिधा पुन्हा सुरू करावा, अशी मागणी मंगळवारी कोल्हापूर जिल्हा रेशन दुकानदारांनी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे केली. यावर जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी वित्तीय विभागातील सारिका नन्नवरे यांच्याशी संपर्क साधला असता पुढील आठ दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने गरिबांचा सणदेखील गोड व्हावा यासाठी आनंदाचा शिधा सुरू होता. मात्र, आता तो बंद केला आहे. गरिबांना दिलासा देणारा हा शिधा पुन्हा सुरू करावा, दिवाळीपूर्वी जून ते सप्टेंबरपर्यंतचे मोफत धान्य वाटपाची कमिशनची रक्कम लवकरात लवकर द्यावी, ई पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणी व पावसामुळे सप्टेंबरच्या धान्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना मुदतवाढ देऊन धान्य वाटपाची परवानगी द्यावी, रेशनची कामे करण्यासाठी दुकानदारांना लॉगिन द्यावे, रेशन दुकानात तेल, डाळी, साखर या जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडे केली.
यावेळी शहराध्यक्ष राजेश मंडलिक, राज्य सदस्य दीपक शिराळे, गजानन हवालदार, अशोक सोलापुरे, धीरज भंडारे, आनंदा लादे, सरिता हरुगुले, तानाजी चव्हाण, साताप्पा कांबळे, आदित्य दावणे, प्रमोद हराळे, पंकज सोरटे उपस्थित होते.