मधुकर बाचूळकर लिखित महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 07:25 PM2020-07-03T19:25:35+5:302020-07-03T19:26:33+5:30

लोकमतच्या शहर कार्यालयात डॉ. बाचूळकर व डॉ. अशोक वाली लिखित महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव या पुस्तकाचे प्रकाशन संपादक वसंत भोसले व वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते झाले.

Rare native plants should be nurtured: Madhukar Bachulkar | मधुकर बाचूळकर लिखित महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव पुस्तकाचे प्रकाशन

लोकमतच्या कोल्हापूर शहर कार्यालयात शुक्रवारी प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर लिखित महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, मनुष्यबळ व प्रशासन विभागाचे व्यवस्थापक संतोष साखरे उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देदुर्मीळ देशी वनस्पतींचे संवर्धन व्हावे  : मधुकर बाचूळकर

कोल्हापूर : महाराष्ट्रात औषधी तसेच वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये असलेली दुर्मीळ देशी वृक्षसंपदा आहे. मात्र आधुनिक कल म्हणून परदेशी झाडे लावली जातात, ज्यांचा निसर्गाला आणि माणसांनाही काही फायदा नसतो. त्यामुळे प्रत्येकाने जागरूकपणे आपल्या दारात, बागेत देशी वनस्पती लावून त्यांचे संवर्धन केले पाहिजे, असे मत ज्येष्ठ वनस्पतिशास्त्र तज्ज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

लोकमतच्या शहर कार्यालयात डॉ. बाचूळकर व डॉ. अशोक वाली लिखित महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव या पुस्तकाचे प्रकाशन संपादक वसंत भोसले व वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

लोकमतमध्ये डॉ. बाचूळकर यांची लेखमाला कोल्हापूरची वृक्षसंपदा या सदराखाली दीड वर्ष प्रसिद्ध होत होती. ती अधिक माहिती व छायाचित्रांसह या पुस्तकरूपाने प्रकाशित झाली आहे.

ते म्हणाले, एक संशोधक म्हणून अभ्यास करताना कोल्हापुरातील औषधांसह विविध गुणधर्म असलेल्या वृक्षसंपदेचे ज्ञान मिळत गेले. शोधनिबंधातून हे ज्ञान स्वत:पुरते मर्यादित न ठेवता ते सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिले पाहिजे याची जाणीव झाली आणि ते नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणून लोकमतने यात महत्त्वाची भूमिका निभावली. यामुळे लोक अधिक जागरूक झाले. लोकमतने प्रसिद्ध केलेले सह्याद्रीचा वारसा हे एकमेव मराठी पुस्तक आहे. यातूनच निसर्गाबद्दलची जागरूकता कळते.

वसंत भोसले म्हणाले, जगभरात कोरोनाने केलेल्या उद्रेकानंतर निसर्गाचा ऱ्हास, वृक्षतोड, पाणी-वायू प्रदूषण, विकासाच्या चुकीच्या संकल्पना, बदलती जीवनशैली यांबाबत गंभीर चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेले हे पुस्तक सगळ्यांनाच मार्गदर्शक ठरेल.

लोकमतमध्ये विविध लेखकांच्या प्रसिद्ध झालेल्या सदरांचे हे नववे पुस्तक आहे. निसर्गावरील संशोधनातून बाचूळकर यांनी महाराष्ट्र आणि देशासाठीही मोठे काम केले आहे. लोकमत चांगल्या व्यक्तींच्या मागे नेहमी खंबीरपणे उभे राहील. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी लोकमतमधील विविध विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title: Rare native plants should be nurtured: Madhukar Bachulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.