कोल्हापूर : जे शेतकरी बाधित होत नाहीत अशा लोकांना सोबत घेऊन जिल्हावासीयांची दिशाभूल करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी विकासाला विरोध करण्यापेक्षा पालकमंत्री, मंत्री, आमदार म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले? याचे आत्मपरीक्षण करावे. थेट पाइपलाइनमधून अभ्यंगस्नान करण्यासाठी कोल्हापूर शहरवासीयांच्या किती दिवाळी खर्ची घातल्या. त्यानंतर स्वत: आंघोळ करून गळकी थेट पाइपलाइन योजना शहरवासीयांच्या माथी मारल्याची टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली.आमदार क्षीरसागर म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांचा विजय हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विजय आहे. पण, त्याचे श्रेय मिळत नाही म्हणून शक्तिपीठ महामार्गाला याचे कारण बनविले जात आहे. शक्तिपीठ महामार्ग हा निवडणुकीचा मुद्दा नसून विकासाचा मुद्दा आहे. हा राजकीय विषय असता तर महायुतीचे दहापैकी दहा उमेदवार निवडून आले असते काय?जे विरोधकांच्या व्यासपीठावर आहेत ते शेतकरी बाधित नाहीतच; पण जे आमच्या बाजूने आहेत ते खरे बाधित शेतकरी आहेत ते शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आहेत. शक्तिपीठ महामार्ग समर्थनार्थ शनिवारी सकाळी ११ वाजता मुस्कान लॉन येथे मेळाव्याचे आयोजन केल्याचेही आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे प्रबोधन करणार : दौलतराव जाधवशक्तिपीठ महामार्गामुळे चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण झाल्यास औद्योगिक, आयटी क्षेत्रासह पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. यातून स्थानिकांना रोजगारनिर्मितीस चालना मिळणार आहे. यासाठी, शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी प्रबोधन करणार असल्याचे ‘गोकुळ’चे माजी संचालक दौलतराव जाधव यांनी सांगितले.