शक्तिपीठ महामार्ग अदानीचे गौण खनिज गडचिरोलीतून पाठविण्यासाठीच, राजू शेट्टींचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:10 IST2025-07-16T19:10:29+5:302025-07-16T19:10:57+5:30
४ राष्ट्रीय महामार्ग व ३ राज्य मार्ग. मग आठवा शक्तिपीठ महामार्ग कशासाठी

शक्तिपीठ महामार्ग अदानीचे गौण खनिज गडचिरोलीतून पाठविण्यासाठीच, राजू शेट्टींचे टीकास्त्र
आजरा : भाविकांच्या सोयीपेक्षा अदानी उद्योग समूहाचे गौण खनिज गडचिरोलीमधून थेट वास्को येथील त्यांच्या पोर्टवरून निर्यात करण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग केला जाणार आहे. भाविकांचे कारण दाखवून हा प्रकल्प जनतेच्या माथी मारला जात असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.
शेळप (ता. आजरा) येथे झालेल्या शक्तिपीठविरोधी बैठकीत ते बोलत होते. शेळपजवळून जाणारा संकेश्वर ते बांदा हा राष्ट्रीय महामार्ग नुकताच पूर्ण झाला आहे. या रस्त्यावर अत्यंत तुरळक वाहतूक आहे. शक्तिपीठ करून राज्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा कुटील डाव आहे.
या महामार्गाचा भार राज्यातील सामान्य जनता व वाहनधारकांच्या टोलमधून पुढील ९० वर्षांसाठी वसूल केला जाणार आहे. त्याबरोबरच या महामार्गातून ५० हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठीचा खटाटोप असल्याने सर्व थरातून विरोध होत असतानाही राज्य सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीकाही शेट्टी यांनी केली.
सर्फनाला प्रकल्पासाठी शेळप गावातील ३५० एकर जमीन संपादित केली आहे. आता गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असल्याने बहुतांशी शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यांना पर्यायी जमीन नसल्याने शेती व्यवसायाचे नवीन संकट उभे राहत आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढ्यामध्ये शेळप ग्रामस्थांनी एकजूट करीत एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार बैठकीत केला.
आता शक्तिपीठ महामार्ग कशासाठी?
कोल्हापूरमधून गोव्याला जाण्यासाठी एकूण सात रस्ते असून, त्यापैकी ४ राष्ट्रीय महामार्ग व ३ राज्य मार्ग आहेत. मग आठवा शक्तिपीठ महामार्ग कशासाठी, असा प्रश्न शेतकऱ्यांनी बैठकीत केला.