Kolhapur: ठकसेन राजेंद्र नेर्लीकरचे पसार काळातही फॉरेक्स ट्रेडिंगचे जाळे, पोलिस तपासात आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:49 IST2025-10-21T16:48:45+5:302025-10-21T16:49:02+5:30
ओळख लपवून कोट्यवधींची गुंतवणूक घेतली : साथीदार सचिन विभुतेलाही बेड्या

Kolhapur: ठकसेन राजेंद्र नेर्लीकरचे पसार काळातही फॉरेक्स ट्रेडिंगचे जाळे, पोलिस तपासात आले समोर
कोल्हापूर : ठकसेन राजेंद्र भीमराव नेर्लीकर (वय ४८, रा. हुपरी, ता. हातकणंगले) याने पसार असलेल्या काळातही ओळख लपवून फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधींची गुंतवणूक घेतल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. आदमापूर येथील एका लॉजमध्ये राहून त्याने अवघ्या दोन महिन्यांत गुंतवणूकदारांना पुन्हा कोट्यवधींचा गंडा घातला. याप्रकरणी त्याला मदत करणारा साथीदार सचिन विरुपाक्ष विभुते (वय ३९, रा. कोते, ता. राधानगरी) याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली.
फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा नेर्लीकर ऑक्टोबर २०२४ पासून पसार होता. या काळात तो कर्नाटकातील सीमाभागासह सोलापूर, सांगली, पुणे येथे लपला होता. दोन महिन्यांपूर्वी तो आदमापूर येथील एका लॉजमध्ये राहायला आला. ओळख लपवून त्याने जुनेच उद्योग पुन्हा सुरू केले. याच ठिकाणी राहून त्याने काही साथीदारांच्या मदतीने नव्याने फॉरेक्स ट्रेडिंगसाठी गुंतवणूक घेणे सुरू केले होते. अवघ्या दोन महिन्यांत गुंतवणूकदारांकडून सुमारे दोन कोटी रुपये घेतल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर येत आहे. दिवसाला एक टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवून तो पैसे घेत होता.
या कामात त्याला सचिन विभुते याने मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. पोलिसांनी त्याला कोते येथून अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याची बुधवारपर्यंत (दि. २२) पोलिस कोठडीत रवानगी झाली. त्यानेच आदमापूर येथे स्वत:च्या नावावर लॉजची रूम बुक केली होती. स्वत:चे बँक खातेही त्याने नेर्लीकरला वापरायला दिले होते. गुंतवणूक घेण्यातही त्याचा पुढाकार होता, अशी माहिती चौकशीत समोर आल्याचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांनी सांगितले.
फसवणुकीचा आकडा २१ कोटींवर
नेर्लीकर याच्या विरोधातील तक्रारींचा ओघ वाढत असल्याने फसवणुकीचा आकडा २१ कोटींवर पोहोचला आहे. यात कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई यासह कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांचा समावेश आहे.