Rain rains; Kolhapur city tumbles! | पावसाने झोडपले; कोल्हापूर शहर तुंबले!
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे सरकू लागली आहे. कसबा बावडा येथील जुना राजाराम बंधारा पाण्याखाली गेला असून, गुरुवारी नवीन पुलाचे बांधकामही पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर होते, तर दुसऱ्या छायाचित्रात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात पाणी आले आहे.

ठळक मुद्दे वाहतुकीची कोंडी : जनता बझार चौक, लक्ष्मीपुरी येथे कोंडीने वाहनधारक त्रस्त; पूर पाहण्यास गर्दी

कोल्हापूर : मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे गुरुवारी दिवसभर शहरातील काही भागांत पाणी साचून राहणे, वाहतुकीची कोंडी होणे अशा विविध प्रकारांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. विशेषत: राजारामपुरी जनता बझार चौक, लक्ष्मीपुरी या ठिकाणी पाणी साचून राहण्याचा प्रकार झाला; तर शहराच्या काही परिसरांत वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकांसह पादचारीही त्रस्त झाले.

मध्यरात्रीपासून पावसाने शहरासह परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहराच्या सखल भागांत दुपारपर्यंत पाणीच पाणी झाले होते. दुपारनंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार झाल्याने पाणी साचून राहिले होते. विशेषत: राजारामपुरी जनता बझार चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. दुपारनंतर काही प्रमाणात पावसाची उघडझाप सुरू होती.

शहराच्या अनेक ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्याचे काम करीत होते, तर ड्रेनेज विभागाचे कर्मचारी ड्रेनेजची झाकणे काढून साफसफाईचे काम करीत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकाचा रस्ता भुसभुसीत झाल्याने या चौकातून वाहतूक वळविण्यात आली. त्यामुळे महावीर कॉलेजकडून आलेल्या वाहनधारकांना जिल्हा परिषदेच्या अलीकडील चौकातून आपले वाहन पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर आणावे लागत होते. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी आणि वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र दिवसभर होते.

दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने वाहतूक सुरळीत झाली. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंट येथून नदीचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी कोल्हापूरवासीयांनी दिवसभर गर्दी केली होती.

तालुकावर आज सकाळपर्यंत आणि आजअखेर झालेला पाऊस
हातकणंगले- ६.८८ मि.मी., एकूण- १९६.१३ मि.मी., शिरोळ- ६.८६. एकूण १७२.५७; पन्हाळा- ५१.८६, एकूण ५७३.८६, शाहूवाडी- ५४, एकूण ७९२.५०; राधानगरी- ७०.५०, एकूण ८०४.३३; गगनबावडा-१२२, एकूण १७५७.५०; करवीर- २९.६४, एकूण ४५१.१८; कागल- २६.५७, एकूण ४५९.७१; गडहिंग्लज-२३, एकूण ३६८.१४;, भुदरगड- ४७.८०, एकूण ६४४.४०; आजरा- ८५.७५, एकूण ९०१; चंदगड- ६९.५०, एकूण ८८६.५०.
 

कोदे लघुप्रकल्प व जांभरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला
पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे सात, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे व शिरगाव हे पाच, तुळशी नदीवरील बीड व आरे हे दोन, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, तांदूळवाडी, खोची, कोडोली व शिगाव हे सहा, कासारी नदीवरील यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपण, वालोली, बाजारभोगाव व करंजफेण हे सहा, कुंभी नदीवरील कळे, वेतवडे, मांडुकली व शेणवडे हे चार, कडवी नदीवरील शिरगाव, सवते सावर्डे व पाटणे हे तीन, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, शेणगाव, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली हे नऊ, हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, साळगाव व निलजी हे तीन, घटप्रभा नदीवरील कानडे-सावर्डे, आडकूर, बिजूर भोगोली व हिंडगाव हे चार, ताम्रपर्णी नदीवरील चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, धोलगरवाडी, माणगाव व कोवाड हे सहा, दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सुळकूड व सिद्धनेर्ली हे तीन आणि धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे हे दोन बंधारे पाण्याखाली गेले असून रात्री उशिरापर्यंत ७५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.


या रस्त्यावर वाहनधारकांची कसरत
शिवाजी विद्यापीठ ते राजारामपुरी, उचगाव ते राजारामपुरी, शिरोली नाका ते दसरा चौक, वाशी नाका ते रंकाळा, फुलेवाडी ते रंकाळा, शिवाजी पूल ते दसरा चौक, जुना देवल क्लब रस्ता ते बिंदू चौक, संभाजीनगर पेट्रोल पंप ते नंगीवली चौक, नंगीवली चौक ते कोळेकर तिकटी, आदी ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यातून वाट काढताना वाहनधारकांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे.
 

यासोबत विशेषत: स्टेशन रोड, कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, शिवाजी चौक, बिनखांबी गणेश मंदिर, टेंबे रोडवरील साईमंदिर चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक, गोखले कॉलेज चौक, शिवाजी टेक्निकल परिसर, माळकर तिकटी, पापाची तिकटी, आदी परिसरांत वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
 

ओढ्यातून वाहून जाणाऱ्या वृद्धास वाचविले
कोल्हापूर : हुतात्मा पार्क येथील ओढ्यातून वाहून जात असलेल्या ५० वर्षीय अनोळखी वृद्धास अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून वाचविले. ही घटना हुतात्मा पार्क गार्डन येथे गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. गुरुवारी सकाळी या पाण्यात ५० वर्षे वयाचा वृद्ध अडकला. त्यातून तो वाहून जात होता. ही घटना रस्त्यावरून जाणाºया तसेच उद्यानातील नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने अग्निशमन दलास ही माहिती दिली. त्यावेळी प्रतिभानगरातील अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने ओढ्यातील वृद्धास अथक प्रयत्नांनंतर पाण्यातून बाहेर काढले


कोल्हापुरातील राजारामपुरी जनता बझार चौकात गुरुवारी पुन्हा एकदा पावसाचे पाणी साचले. त्यातून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागली.


Web Title: Rain rains; Kolhapur city tumbles!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.