लोकमत न्यूज नेटवर्क, जयसिंगपूर / कुरुंदवाड : जयसिंगपूरसह, शिरोळ, कुरुंदवाडसह परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वारा, गारा आणि मेघगर्जनेसह पावसाने झोडपून काढले. त्यामुळे प्रचंड उष्माने हैराण झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, जयसिंगपूर येथे आठवडी बाजारात विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, दानोळीत, यड्रावमध्ये गारांचा पाऊस झाला.
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उभ्याने नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाने झोडपून काढले. काही प्रमाणात गाराही पडल्या. त्यामुळे बाजारपेठेत व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. रस्त्यावरून पाणी वाहताना तापलेल्या जमिनीच्या वाफा बाहेर पडत होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने तसेच पिकांना पाऊस पोषक ठरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जयसिंगपूर येथे पावसामुळे भाजी विक्रेत्यांचे नुकसान झाले.
इचलकरंजीत मुसळधार पाऊस
इचलकरंजी शहर आणि परिसरामध्ये रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शिवभक्त व नागरिकांची तारांबळ उडाली.
सायंकाळी साडेसहा वाजता जोरदार वारा सुटला. विजेचा कडकडाट आणि वारा यांच्या सोबतीने पावसाने हजेरी लावली. सुमारे एका तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडला. शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले होते. त्यामुळे शिवभक्तांना मंडपाला सावरताना कसरत करावी लागली. त्याचबरोबर पावसामुळे मिरवणुकाही वेळाने निघाल्या.
तीन दिवस जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट'
सोमवारपासून तीन दिवस जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोल्हापुरात मेघगर्जनेसह पावसाचा शिडकावा
कोल्हापूर शहरात रविवारी सायंकाळी मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह केवळ पावसाचा शिडकावा झाला. वाऱ्यामुळे मीराबाग, रंकाळा येथे नारळीचे झाड कोसळून एका पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.
रविवारी सकाळपासूनच वातावरणात उष्मा २ जाणवत होता. उन्हाच्या तडाख्याने अंग भाजून निघत होते. दुपारी तर घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. त्यामुळे सायंकाळी जोरदार पाऊस कोसळणार असेच वातावरण झाले होते. सायंकाळी सात वाजता मेघगर्जनेसह वारे वाहू लागले. मात्र, पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
वादळी वाऱ्याने मात्र अनेक ठिकाणी पडझड झाल्याचे समजते. रंकाळा तलाव परिसरात मीराबाग येथे वाऱ्याने नारळाचे झाड कोसळून सचिन चव्हाण यांच्या पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले. महापालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी झाड बाजूला केले.
Web Summary : Jaysingpur, Shirol, and Kurundwad experienced heavy rain, hail, and thunderstorms, providing relief from the intense heat. Ichalkaranji also received heavy rainfall, disrupting Shiv Jayanti celebrations. The weather department has issued a yellow alert for the district for the next three days, forecasting light to moderate rain.
Web Summary : जयसिंगपुर, शिरोल और कुरुंदवाड में भारी बारिश, ओलावृष्टि और गरज के साथ बौछारें पड़ीं, जिससे भीषण गर्मी से राहत मिली। इचलकरंजी में भी भारी वर्षा हुई, जिससे शिव जयंती समारोह बाधित हुआ। मौसम विभाग ने अगले तीन दिनों के लिए जिले में येलो अलर्ट जारी किया है, जिसमें हल्की से मध्यम बारिश का पूर्वानुमान है।