कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस, मान्सून ५ जूनपर्यंत सक्रिय होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:47 IST2025-05-19T12:46:39+5:302025-05-19T12:47:03+5:30
खरिपपूर्व शेतमशागतीची कामे पूर्णत: खोळंबली

कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस, मान्सून ५ जूनपर्यंत सक्रिय होणार
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात रविवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाची रोज हजेरी असून आगामी तीन-चार दिवस असेच वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेली पाच-सहा दिवस जिल्ह्यात कोठे ना कोठे जोरदार पाऊस कोसळला. रविवारी पहाटेपासूनच आकाश गच्च झाले आणि हलक्या सरी सुरू झाल्या. सकाळी नऊपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर ऊन पडले आणि उष्मा जाणवू लागला. दिवसभर वातावरणात उष्मा होता, सायंकाळी पाचनंतर आकाश गच्च झाले. मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. कोल्हापूर शहरात पंधरा ते वीस मिनिटे एकसारखा पाऊस झाला. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा गारवा मिळाला असला, तरी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना कसरत करावी लागली.
मान्सून ५ जूनपर्यंत कोल्हापुरात
मान्सूनला पूरक असेच सध्या वातावरण आहे. यंदा मान्सून लवकर सक्रिय होणार हे अगोदरच सांगितले आहे. पश्चिम महाराष्ट्रात विशेषता कोल्हापुरात ५ ते ६ जून रोजी मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती हवामान साक्षरता अभियानाचे मुख्य प्रबंधक राहुल पाटील यांनी दिली.
गडहिंग्लज तालुक्याला वळवाने तासभर झोडपले, वीटभट्टी व्यावसायिक अडचणीत
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्याला वळीव पावसाने रविवारी सायंकाळी तासभर झोडपून काढले. त्यामुळे शहरासह शेतशिवारात पाणीच पाणी पाहायला मिळाले. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे आठवडी बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांसह नागरिकांची भंबेरी उंडाली. वारंवार पडणाऱ्या वळवामुळे खरिपपूर्व शेतमशागतीची कामे पूर्णत: खोळंबली आहेत. मान्सूनच्या तोंडावरही वळवाने पाठ न सोडल्याने शेतमशागतीची कामे कशी करायची, या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे.
मार्च ते मे या ऐन घरे बांधणीच्या हंगामातच वळवाने सतत तडाखा दिल्यामुळे यंदा तालुक्यातील वीटभट्टी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, वळवामुळे शेतकऱ्यांचे हुकमी पीक उसाला मोठी ताकद मिळाली असून अनेक भागांत मोठ्या डौलाने ऊस पिके तरारून आली आहेत. हुमणी कीड मरण्यास पाऊस उपयुक्त ठरत आहे.
चिकोत्रा खोऱ्याला झोडपून काढले
पांगिरे : चिकोत्रा खोऱ्यात गेल्या दोन दिवसांत पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, वादळी वाऱ्यासह पावसाने सायंकाळी चिकोत्रा खोऱ्याला झोडपून काढले. रोहिणी जवळ आल्यामुळे येथील शेतकरी भात शेती तयार करण्यात सुरुवात केली आहे. काही वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पावसाचे गेले तीन दिवस वातावरण होते. चिकोत्रा खोऱ्यातील पांगिरे, पिंपळगाव, बारवे, मुरुक्टे, मानवळे, बामणे, नागणवाडी, हेळेवाडी, दिंडेवाडी, आदी गावांना पावसाने झोडपून काढले. मात्र, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे शेतीची कामे खोळंबळी आहेत. येथील शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.