Kolhapur: जयसिंगपूर, उमळवाडमध्ये तीन खासगी सावकारांवर छापे; जिल्हा उपनिबंधकांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:02 IST2025-11-14T12:01:13+5:302025-11-14T12:02:48+5:30
सह्या केलेले ३३ कोरे धनादेश, व्याजाच्या नोंदी जप्त

Kolhapur: जयसिंगपूर, उमळवाडमध्ये तीन खासगी सावकारांवर छापे; जिल्हा उपनिबंधकांची कारवाई
कोल्हापूर-जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर आणि मौजे उमळवाड येथे तीन खासगी सावकारांची घरे आणि व्यवसायांवर जिल्हा उपनिबंधकांनी छापे टाकून कारवाई केली. गुरुवारी (दि. १३) दुपारी केलेल्या कारवाईत धनराज बाळासो भवरे, प्रशांत प्रमोद पोवळे (दोघे रा. जयसिंगपूर) यांच्या राहत्या घरी आणि उमळवाड येथील विमल ज्वेलर्स या दुकानावर छापा टाकला.
अमोल खुरपे व सीमा अमोल खुरपे (रा. जयसिंगपूर) यांच्या राहत्या घरी अवैध सावकारी कार्यवाही अंतर्गत घर झडतीतून सह्या केलेले कोरे धनादेश, व्याजाच्या नोंदीची कागदपत्रे, सोने तारण कागदपत्रे जप्त करण्यात आली.
धनराज भवरे याच्या राहत्या घरातून सह्या केलेले ३३ कोरे धनादेश, तीन करारपत्रे, व्याज व्यवहाराच्या दोन नोंदवह्या, पाच वाहनांचे आरसी बुक, सोने तारण व्याजाच्या नोंदी असलेल्या चिठ्ठ्या मिळाल्या. प्रशांत पोवळे याच्या विमल ज्वेलर्समध्ये काही नोंदवह्या मिळाल्या. या नोंदवह्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतल्या. छाप्याची कारवाई सुरू होताच यातील एका खासगी सावकाराने एक कार कर्जदाराला परत केल्याची माहिती पथकातील अधिका-यांनी दिली.
सहकार विभागाचे एक अधिकारी आणि १२ कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली. तसेच आठ पोलिसही उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार ही कारवाई झाली.
तक्रारी करण्याचे आवाहन
जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध खासगी सावकारी सुरू आहे. यातून कर्जदारांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.