कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) परिसरात एका फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकून हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचे रॅकेट उद्ध्वस्त केले. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला असून सहा पीडित महिलांची सुटका केली. छाप्यात रोख रक्कम, पाच मोबाइलसह ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अनैतिक व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री ही कारवाई केली.वेश्या अड्डा चालवणारे फातिमा विजय देसाई (वय ३३,रा. राजीव गांधी वसाहत, मार्केट यार्ड कोल्हापूर), राहुल सुरेश लोहार (वय ३३, रा. ठाणेकर चौक, पेठ वडगाव, तालुका हातकणंगले) अजय पाटील, परशुराम चवडू पाटील (वय ४५ रा. मलतवाडी, तालुका चंदगड) विनोद माळकरी, पप्पू चव्हाण आणि फार्म हाऊसचा मालक संदीप अनिलराव कदम (रा. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. यापैकी फातिमा देसाई, राहुल लोहार, परशुराम पाटील या तिघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली.कळंबा तर्फ ठाणे गावचे हद्दीत स्वप्नहिल फार्म हाऊसमध्ये बेकायदेशीररीत्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अनैतिक व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री साडेदहा वाजण्यास सुमारास येथे छापा टाकला. यावेळी सहा पीडित महिलांची सुटका केली.ग्राहकांकडून तीन हजार रुपये घेऊन त्यातील दीड हजार रुपये हे रॅकेट पीडित महिलांना देत होते. उर्वरित रक्कम स्वतःसाठी वापरत होते. फार्म हाऊसचा मालक आणि इतर कर्मचारी यांच्या संगनमताने हा व्यवसाय सुरू होता. पीडित महिलांना जबरदस्तीने याठिकाणी वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्ती केले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.पोलिसांनी छापा टाकल्यानंतर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी रोख रक्कम ३ हजार रुपये, ५ मोबाइल एक दुचाकी असा ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
Kolhapur: हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय अड्ड्यावर छापा, सहा पीडित महिलांची सुटका; सात जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:49 IST