जुगारअड्ड्यावर छापा, घरझडतीत पोलिसांना सापडला प्राणघातक शस्त्रसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 17:22 IST2020-07-27T16:53:10+5:302020-07-27T17:22:05+5:30
कळंबा कारागृहानजीक एका घरात सुरू असलेल्या तीनपानी जुगारअड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात १९ जणांना अटक करण्यात आली. घरझडतीत पोलिसांना प्राणघातक शस्त्रसाठा सापडला.

जुगारअड्ड्यावर छापा, घरझडतीत पोलिसांना सापडला प्राणघातक शस्त्रसाठा
कोल्हापूर : कळंबा कारागृहानजीक एका घरात सुरू असलेल्या तीनपानी जुगारअड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात १९ जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, यावेळी छाप्यात घेतलेल्या घरझडतीत पोलिसांना प्राणघातक शस्त्रसाठा सापडला. ही कारवाई जुना राजवाडा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा केली.
या कारवाईत रोख २८ हजार ४०० रुपयांसह एक चारचाकी वाहन, पाच दुचाकी व १६ मोबाईल हँडसेट असा सुमारे ७ लाख ७९ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक केलेल्यांची नावे अशी, कासीम इमाम मुल्ला (रा. लक्षतीर्थ वसाहत), विजय चंदर भोसले (वय ४४ रा. ८६९/२ बी वॉर्ड, कळंबा कारागृहानजीक, कोल्हापूर), परशुराम बाजीराव कांबळे (४६ रा. सदर बझार हौसिंग सोसायटीशेजारी, सदर बझार), सचिन वसंत हेगडे (३८), आलम इमाम मुल्ला (३० दोघेही रा. लक्षतीर्थ वसाहत), सूर्यकांत बाबूराव चौगुले (५२), अझहर दस्तगीर फकीर (४६ दोघेही रा. सदर बझार), रोहित राजेंद्र नलगे (२६ रा. कळंबा ता. करवीर), रुपेश ऊर्फ सागर पांडुरंग माने (३१), विजय सुनील साठे (२२, दोघेही रा.कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा), सुरेश लक्ष्मण कुऱ्हाडे (४४ रा. दौलतनगर), राकेश किसन चौगुले (३३ रा. राजाराम चौक, टिंबर मार्केट), मोहन कचोर सिद्धगणेश (३० रा. शोलेनगर झोपडपट्टी), अजित जालंदर गायकवाड (४७ रा. यादवनगर), बकशु महमद मंगळवेढे (३० रा. वाल्मिकी आंबेडकर नगर), वसंत माराप्पा पुजारी (४० रा. विचारेमाळ), सागर खंडू कांबळे (२८ रा. राजेंद्रनगर), सतीश सर्जेराव जगदाळे (३८ रा. रंकाळा टॉवर), समीर मौला बागवान (३२ रा. लक्षतीर्थ वसाहत)
पोलिसांची माहिती अशी की, कळंबा कारागृहशेजारी विजय भोसले याच्या घरात कासीम मुल्ला हा संचारबंदी आदेशाचा भंग करून स्वत:च्या फायद्यासाठी तीनपानी पत्त्याचा जुगारअड्डा चालवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली.
रविवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिसांनी भोसले याच्या घरावर छापा टाकला. तेथे बेकायदेशीर जमाव करून पैसे लावून तीनपानी जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी कारवाईत एकूण १९ जणांना अटक केली. कारवाईत २८,४०० रुपयांची रोकड तसेच १ लाख २१ हजार रुपये किमतीचे १६ मोबाईल हँडसेट, एक अलिशान जीपगाडी, पाच दुचाकी असा एकृूण सुमारे ७ लाख ७९ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
घरझडतीत प्राणघातक शस्त्रसाठा जप्त
पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता विजय भोसले याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी बेकायदेशीररित्या ठेवलेल्या चार तलवारी, २ एडके हत्यार, एक कोयता अशी प्राणघातक शस्त्रे जप्त केली. याप्रकरणी विजय चंदर भोसले याच्यावर भारतीय हत्यार अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
दोन दिवसांत पाच जुगारअड्ड्यांवर छापे
शहर व उपनगरांत तीनपानी जुगार अड्डे तेजीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसर जुना राजवाडा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी साकोली कॉर्नरवरील दयावान ग्रुप इमारतीवर छापा टाकला. त्यानंतर संभाजीनगरातील सुधाकरनगर तर आता कळंबा कारागृहानजीक घरावर येथे छापे टाकून कारवाई केली. शिवाय शनिवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलिसांनी सुतारमळा येथे छापा टाकला तर करवीर तालुक्यात बालिंगा येथेही छापा टाकला होता.