Put the SIM card on the bench outside, then reached the jail! | कळंबा कारागृह : सीमकार्ड बाहेर बाकावर ठेवले, नंतर कारागृहात पोहोचले!

कळंबा कारागृह : सीमकार्ड बाहेर बाकावर ठेवले, नंतर कारागृहात पोहोचले!

ठळक मुद्दे कळंबा कारागृह : सीमकार्ड बाहेर बाकावर ठेवले, नंतर कारागृहात पोहोचले!आणखी दोन संशयितांना अटक; कारागृहातील यंत्रणा सहभागाची शक्यता

कोल्हापूर : कळंबा कारागृहाबाहेर बाकड्यावर सीमकार्ड ठेवले अन‌् नंतर कारागृहात जाणाऱ्या व्यक्तीने तेच सीमकार्ड गुपचूप घेऊन कैद्यांपर्यत पोहोचवल्याचे चौकशीत पुढे आल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.

दरम्यान, कारागृहाच्या भिंतीवरून दहा मोबाईल व गांजा आत फेकल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आणखी दोघांना गुरुवारी अटक केली. ओंकार ऊर्फ मुरली दशरथ गेंजगे (वय २२, रा. साईनगर, शहापूर, इचलकरंजी), राजेंद्र ऊर्फ दाद्या महादेव धुमाळ (३०, रा. गणेश कॉलनी, जयसिंगपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दि. २२ डिसेंबरला मध्यरात्री भीष्म्या ऊर्फ भीम्या सुभेदार चव्हाण (रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), राजेंद्र धुमाळ, ऋषिकेश सदाशिव पाटील (२५, रा. कोदवडे, ता. राधानगरी, सध्या रा. गंगावेश), जयपाल किसन वाघमोडे (रा. वडिये, ता. कडेगाव, जि. सांगली, सध्या रा. गंगावेश) यांनी कळंबा कारागृहाच्या भिंतीवरुन आत मोबाईल फेकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पैलवान ऋषिकेश व शुभम सोपान ऐवळे (वय २३, रा. शहापूर, इचलकरंजी) याला यापूर्वीच अटक केली आहे.

दरम्यान, गुरुवारी राजेंद्र धुमाळ व ओंकार गेंजगे यांना अटक केली. गेंजगे हा विटा (सांगली) येथील एका खूनप्रकरणी कारागृहात न्यायालयीन कैदी होता. काही महिन्यांपूर्वी गेंजगे याच्या सहकाऱ्याने सीमकार्ड कारागृहाबाहेर बाकावर ठेवले. आत जाणाऱ्या व्यक्तीने तेच सीमकार्ड कारागृहात गेंजगेपर्यत पोहोचवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

हेच सीमकार्ड शुभम ऐवळे याच्या नावे असल्याचे तसेच ते कारागृहात गेंजगे व खंडेलवाल यांनी वापरले. त्यामुळे याप्रकरणी कारागृहातील काही कर्मचारी सहभागी असल्याचेही दिसते. अटकेतील गेंजगे व शुभम ऐवळे हे दोघे नातेवाईक आहेत. भिंतीवरून कारागृहात राजेंद्र धुमाळ यानेच आत मोबाईलचे गाठोडे टाकल्याचे चौकशीत उघडकीस आले.

कारागृहातून खंडेलवालनेच फोनवरुन १० मोबाईल मागवले

सापडलेल्या सीमकार्डचा गेंजगे व खंडेलवाल यांनी किमान तीन महिने कारागृहातून बाहेर कॉलसाठी वापर केल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. कारागृहातील संशयित विकास खंडेलवाल याने कारागृहातून याच सीमकार्डवरुन भीष्म्या चव्हाण याला फोन करून दहा मोबाईल पाठविण्याचा निरोप दिल्याचेही दिसून आले.

भीष्म्या चव्हाण अटकेनंतर उलगडा
अद्याप पोलिसांना गुंगारा देणारा भीष्म्या चव्हाण याला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून आणखी धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
 

Web Title: Put the SIM card on the bench outside, then reached the jail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.