Kolhapur: ‘ओएलएक्स’वरुन कार खरेदी केली, कार अन् पैसेही घेऊन भामटा पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 16:30 IST2024-08-01T16:30:01+5:302024-08-01T16:30:46+5:30
नाव बनावट असल्याचा संशय

Kolhapur: ‘ओएलएक्स’वरुन कार खरेदी केली, कार अन् पैसेही घेऊन भामटा पसार
कोल्हापूर : ओएलएक्सवरून कार खरेदी केल्यानंतर चार दिवसांनी कागदपत्र नावावर करून देण्याच्या बहाण्याने बोलवून भामटा कार घेऊन गायब झाला. हा प्रकार मंगळवारी (दि. ३०) दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (आरटीओ) घडला.
याबाबत कळंबा येथील तरुणाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सुरेश पाटील (रा. भगवा चौक, कसबा बावडा) या भामट्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून संशयित पाटील याचा शोध सुरू आहे. मात्र, तो कोल्हापूरचा नसावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
शाहूपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँकेत नोकरी करणारा कळंबा येथील तरुण कार खरेदी करणार होता. ओएलएक्सवर त्याला मारुती बलेनो कार पसंत पडली. २ लाख ७० हजार रुपयांना व्यवहार ठरला. सागर पाटील याने शुक्रवारी (दि. २६) फिर्यादीला कोल्हापुरात कार देऊन रोख २ लाख ७० हजार रुपये घेतले.
त्यानंतर मंगळवारी कागदपत्र नावावर करून देण्याच्या बहाण्याने त्याने आरटीओ ऑफिससमोर बोलवून घेतले. झेरॉक्स काढण्यासाठी ते रमण मळा पोस्ट ऑफिसजवळ गेले. त्यावेळी भगवा चौकात जाऊन येतो, असे सांगून कार घेऊन गेलेला पाटील परतलाच नाही. त्याचा फोनही बंद असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
नाव बनावट असल्याचा संशय
सागर पाटील याने आपण एजंट असल्याचे सांगितले. त्याने स्वत:च्या ओळखीचा काहीच पुरावा फिर्यादींना दिला नाही. कारची कागदपत्रेही फिर्यादींना दाखवली नाहीत. कारचा नंबर आणि एजंटचे नावही बनावट असावे, तसेच तो कसबा बावड्यात राहणारा नसावा, अशा संशय बळावला आहे.