शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; वाहतुकीत बदल, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:37 IST2025-07-01T11:35:08+5:302025-07-01T11:37:29+5:30
आंदोलन मागे घेण्यासाठी राजू शेट्टींना नोटीस

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; वाहतुकीत बदल, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात-video
कोल्हापूर : नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज मंगळवारी शिरोली येथील पंचगंगा नदीच्या पुलावर पुणे-बंगळूरू महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे तब्बल दोन तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक वळवण्यात आल्याने शहरासह पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
आंदोलनादरम्यान, काही शेतकऱ्यांनी नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस प्रशासनाने वेळीच अटकाव केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, यावेळी घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महामार्गावरील वाहतुकीत बदल
महामार्गावर वाहनांची कोंडी टाळण्यासाठी कागलकडून पुण्याकडे जाणारी वाहने लक्ष्मी टेक येथून पंचतारांकित एमआयडीसीमार्गे इचलकरंजी, हातकणंगलेमार्गे सांगली आणि पेठवडगाव, वाठारमार्गे पुण्याकडे सुरु होती. काही वाहने उजळाईवाडी येथून शाहूनाकामार्गे कसबा बावडा, शिये फाटा येथून पुण्याच्या दिशेने सोडली गेली. कागलच्या दिशेने जाणारी वाहने वाठार येथून पेठवडगाव, इचलकरंजीमार्गे पुढे कागलच्या दिशेने वळवण्यात आली होती. काही वाहने शिये फाटा येथून शहरातील जुन्या महामार्गावरून पुढे कागलच्या दिशेने सुरु होती.
बंदोबस्तासाठी ३०० पोलिस
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३०० पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महामार्गावर वाहनांची कोंडी होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना अधीक्षक योगेश कुमार यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
आंदोलन मागे घेण्यासाठी राजू शेट्टींना नोटीस
आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर पोलिसांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना नोटीस पाठवली आहे. जिल्ह्यात बंदी आदेश लागू असल्याने आंदोलन करता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
शेतकऱ्याने नदीत उडी मारण्याचा केला प्रयत्न