ऊस दरावरून आंदोलन पेटले; मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या हालचाली, जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:00 IST2025-11-03T11:59:50+5:302025-11-03T12:00:36+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराचा आज तोडगा निघणार का?

ऊस दरावरून आंदोलन पेटले; मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या हालचाली, जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक
कोल्हापूर : ऊस दरावरून जिल्ह्यात निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज, सोमवारी सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार, शेतकरी संघटना प्रतिनिधींची बैठक बोलावले आहे. उद्या, बुधवारी मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या असून ऊस दराचा तोडगा आज तरी निघणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ऊस दरावरून पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन पेटले असून साखर कारखानदार व संघटना कार्यकर्ते आमने-सामने येत असल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. ऊस वाहतूक करणारी वाहने पेटवली जात असल्याने ठिकठिकाणी संघर्ष सुरू आहे. ‘स्वाभिमानी’ संघटनेने चालू हंगामासाठी प्रतिटन ३,७५१ रुपयांची मागणी केली आहे. मात्र, साखर कारखान्यांनी ३,४०० ते ३,५२५ रुपये जाहीर केली आहे. त्यामुळे संघटना आक्रमक झाल्या आहेत.
त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी गनिमी काव्याने सामोरे जाण्याचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदार, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावली आहे. यामध्ये संघटनांनी चालू हंगामात प्रतिटन ३,७५१ रुपयांच्या केलेल्या मागणीवर चर्चा होणार आहे.
‘स्वाभिमानी’ने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी दिलेल्या इशाऱ्यामुळे जिल्हा प्रशासन जागे झाले आहे. यावर्षी ३,७५१ रुपये पहिली उचल घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसत नाही. आजच्या बैठकीत तोडगा निघाला तर ठीक अन्यथा आंदोलन तीव्र करू. - राजू शेट्टी (नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना)
गेली वर्षभर साखरेला चांगला भाव असल्याने मागील हंगामातील देय रक्कम आणि चालू हंगामातील उचलीबाबत सकारात्मक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच राहील. - शिवाजी माने (अध्यक्ष, जय शिवराय संघटना)