कोल्हापुरात सायबर चौक, संभाजीनगरमध्ये उड्डाणपुलाचा प्रस्ताव - अमल महाडिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:22 IST2025-08-23T17:21:02+5:302025-08-23T17:22:01+5:30
महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आमदार महाडिक यांनी शहरातील विविध प्रश्नांसंबंधी महापालिकेत बैठक घेतली

कोल्हापुरात सायबर चौक, संभाजीनगरमध्ये उड्डाणपुलाचा प्रस्ताव - अमल महाडिक
कोल्हापूर : भविष्यात बहुतांश प्रशासकीय कार्यालये शेंडा पार्कात स्थलांतरित होणार असल्याने सायबर चौक व संभाजीनगर परिसरात प्रत्येकी साडेबारा कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला असल्याचे सांगत या परिसरातील वाढत्या नागरीकरणासाठी भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार अमल महाडिक यांनी मनपा अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिल्या.
महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आमदार महाडिक यांनी शहरातील विविध प्रश्नांसंबंधी महापालिकेत बैठक घेतली. महाडिक म्हणाले, शहरांतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा अत्याधुनिक बनवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय आणि महानगरपालिका यांच्यात समन्वय बैठक घ्या.
वाचा - कोल्हापुरात एंट्रीला दररोजची वाहतूककोंडी, वाहनचालक वैतागले
अमृत योजनेच्या कामाचे टप्पे तयार करून प्रभागनिहाय कामे पूर्ण करावीत. संपूर्ण शहरभर अर्धवट कामे ठेवू नयेत. शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन पुलांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही आमदार महाडिक यांनी दिल्या.
गांधीनगर येथील केएमटीच्या जागेवर व्यापारी संकुल आणि बस डेपो उभारण्यासंदर्भात आराखडा व शहराचा तिसरा सुधारित विकास आराखडा लवकरात लवकर तयार करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांबाबत असंख्य तक्रारी असल्याचा मुद्दा आमदार महाडिक यांनी या बैठकीत उपस्थित केला.