कोल्हापुरातील सम्राट कोराणेकडून फरार काळात कोट्यवधींची मालमत्ता खरेदी, पैसे आणले कुठून?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:45 IST2025-02-19T12:45:24+5:302025-02-19T12:45:42+5:30
फरार काळात अनेकांच्या संपर्कात, मोबाइल सिम कोणी पुरवले?

कोल्हापुरातील सम्राट कोराणेकडून फरार काळात कोट्यवधींची मालमत्ता खरेदी, पैसे आणले कुठून?
कोल्हापूर : मटका बुकी सम्राट कोराणे याने फरार काळात नागाळा पार्क परिसरात पत्नीच्या नावे फ्लॅटची खरेदी केली, तसेच साळशिरंबे (ता. कराड, जि. सातारा) येथे पाच एकर शेतजमिनीची खरेदी केली आहे. साथीदारांनी त्याला वेळोवेळी १६ लाख ५० हजार रुपये पाठवले. त्यानेही काही साथीदारांना हवाला आणि कुरिअरद्वारे पैसे पाठवल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली. याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. त्यानुसार दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी कोराणे याच्या पोलिस कोठडीत २५ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली.
सहा वर्षे पोलिसांना चकवा दिल्यानंतर स्वत:हून न्यायालयात हजर झालेला मटका बुकी सम्राट कोराणे याची १२ दिवसांची पोलिस कोठडी मंगळवारी संपली. त्याला पोलिसांनी पुन्हा न्यायालयात हजर करून कोठडी वाढवून मागितली. यावेळी सरकारी वकील अमित महाडेश्वर यांनी गेल्या १२ दिवसांतील तपासाची माहिती न्यायाधीशांना सांगितली. फरार काळात कोराणे याने पत्नीच्या नावे नागाळा पार्क येथे दोन बेडरूमचा फ्लॅट खरेदी केला. त्यानंतर कराड तालुक्यात साळशिरंबे गावात पाच एकर शेतजमीन खरेदी केली.
हवाला आणि कुरिअरच्या माध्यमातून त्याने काही साथीदारांना सुमारे ५० ते ६० लाखांची रक्कम पाठवली आहे. त्यालाही काही साथीदारांनी आर्थिक मदत केली. याचा तपास करण्यासाठी अजून पोलिस कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद ॲड. महाडेश्वर यांनी केला. त्यानुसार न्यायाधीश कश्यप यांनी कोराणे याच्या पोलिस कोठडीत आठ दिवसांची वाढ केली.
घरात सापडल्या जुन्या नोटा
आठवड्यापूर्वी पोलिसांनी कोराणे याच्या शिवाजी पेठेतील घराची झडती घेतली. त्यावेळी एकूण ६८ हजार ८०० रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. त्यामध्ये २३ हजार ५०० रुपयांच्या जुन्या नोटा मिळाल्या, तसेच दोन ते तीन मालमत्तांची कागदपत्रे मिळाली, अशी माहिती वकिलांनी दिली.
पैसे आणले कुठून?
फरार काळात कोराणेचे अवैध धंदे बंद होते, असा पोलिसांचा दावा होता. त्याची बँक खाती गोठवल्याचेही पोलिसांनी सांगितले होते. तरीही त्याने कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्या. यासाठी पैसे कुठून आणले, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
मोबाइल सिम कोणी पुरवले?
फरार काळात कोराणे अनेकांच्या संपर्कात होता. यासाठी त्याने कोणाच्या नावावर मोबाइल सिम घेतले? आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी कोणाच्या बँक खात्यांचा वापर केला? रोख स्वरूपात कोणी मदत केली? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोघांकडून मिळाले साडेसोळा लाख
अटकेतील विजेंद्र ऊर्फ सोन्या कोराणे आणि उत्तम मोरे यांनी गेल्या चार वर्षांत कोराणे याला १६ लाख ५० हजार रुपये पाठवले आहेत. ही रक्कम या दोघांना कोणाकडून मिळाली, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.