टीईटी परीक्षांचे नियोजन करणारेच निघाले फितूर, उत्तर भारतात धागेदोरे; दोघांचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:19 IST2025-11-26T11:18:46+5:302025-11-26T11:19:23+5:30
लाभार्थ्यांचे धाबे दणाणले : पेपर फुटीचा लाभ घेऊन पात्र ठरलेल्या परीक्षार्थींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. नोकरी जाण्याची शक्यता असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

टीईटी परीक्षांचे नियोजन करणारेच निघाले फितूर, उत्तर भारतात धागेदोरे; दोघांचा शोध सुरू
कोल्हापूर - टीईटी पेपरफुटी प्रकरणी शासकीय, निमशासकीय परीक्षांचे नियोजन करणाऱ्या खासगी संस्था संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. टीईटी आणि सेटचे पेपर फोडण्यात उत्तर भारतातील दोघांचा हात असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली. पेपर फोडणाऱ्या दोघांचा शोध सुरू आहे.
पेपर फुटीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गायकवाड बंधूंना उत्तर भारतातील दोघांकडून टीईटीची प्रश्नपत्रिका मिळणार होती. २०२३ मध्ये त्यांनीच टीईटी आणि सेटची प्रश्नपत्रिका एक दिवस आधी पुरवली होती. गेल्या चार वर्षांपासून ते गायकवाड बंधूंच्या संपर्कात आहेत. त्यांनी विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका गायकवाड बंधूंना पुरविल्याचा संशय आहे. शासनाकडून बहुतांश परीक्षांचे नियोजन राज्याबाहेरील खासगी संस्थांना दिले जाते. ऑनलाइन अर्ज घेणे, बैठक व्यवस्था करणे, प्रश्नपत्रिका काढणे, निकाल जाहीर करण्याची जबाबदारी या संस्थांवर असते. यातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पेपर फोडण्याचे प्रकार घडतात. त्याच पद्धतीने गायकवाड बंधूंनी महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फोडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोबाइल फॉरमॅट केला
या गुन्ह्याचा सूत्रधार महेश गायकवाड याला पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागली होती. भाऊ संदीप गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेताच, महेश याने त्याचा मोबाइल फॉरमॅट केला. सर्व मोबाइल नंबर, मेसेज, अपलोड-डाऊनलोड फाइल्स डिलिट केल्या. व्हॉट्सॲप आणि गुगल अकाऊंटचाही बॅकअप डिलिट केला. त्याच्या भावाच्या मोबाइलमधून डेटा घेतला जात आहे.
अटकेतील एजंट राहुल पाटील याच्याकडे पोलिसांना १३० परीक्षार्थींच्या नावांची यादी मिळाली. अशाच याद्या इतर एजंटांकडेही मिळाल्या. प्रत्येक एजंटाने त्यांच्याकडील परीक्षार्थींची व्यवस्था जिल्ह्यात ठिकठिकाणी केली होती. यापूर्वी पेपर फुटीचा लाभ घेऊन पात्र ठरलेल्या परीक्षार्थींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.