Kolhapur Accident: आंबा घाटात ८० फूट खोल दरीत खासगी बस कोसळली, नेपाळी बाग कामगारांना घेवून जात होती कोकणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 11:52 IST2025-12-05T11:50:45+5:302025-12-05T11:52:50+5:30
११५ नेपाळी कामगार बचावले

Kolhapur Accident: आंबा घाटात ८० फूट खोल दरीत खासगी बस कोसळली, नेपाळी बाग कामगारांना घेवून जात होती कोकणात
आंबा : नेपाळी बाग कामगारांना घेवून कोकणात निघालेली खासगी बस आंबा घाटात चक्री वळणावर संरक्षण कठडा तोडून ८० फूट खोल दरीत कोसळली. केवळ दैव बलवत्तर दरीतील झाडीत गाडी अडकल्याने सर्व प्रवाशी बचावले. आज, शुक्रवारी (दि.५) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नेपाळमधील बाग कामगार मध्यप्रदेशमधून खासगी बस क्रमांक (एमपी.१३.पी. १३७) मध्यरात्री कोल्हापूर हून रत्नागिरीला निघाली होती. गाडीत ११५ प्रवासी बसवले होते. घाटात चालकाच्या डोळ्यावर झापड आल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने संरक्षण कठडा तोडून ८० फूट खोल दरीत कोसळली. दरीत झाडामध्ये बस अडकल्याने मोठा अनर्थ टळला. यात काही प्रवाशी जखमी झाले. जखमींना साखरपामधून रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलिस व आंब्यातील तरुणाचे मदत पथक तासाभरात पोहचले. चोवीस जखमींना रस्त्यावर घेवून साखरपा रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास साखरपा पोलीस करीत आहेत. आंब्यातील भाई पाटील दिनेश कांबळे, दिग्वीजय गुरव ,दिपक भोसले, तुषार पाटील यांनी मदत केली.
गाडीत दुप्पट प्रवाशी
बसची क्षमता ६० असताना गाडीत दुप्पटीने प्रवाशी बसवले होते. दरीत गाडी कोसळली तेव्हा सर्व झोपेत होते. दरीत बस कोसळताच एकच गोंधळ उडाला.