निवडणुकीमुळे १२०९ सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवाया, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 17:55 IST2025-12-18T17:54:52+5:302025-12-18T17:55:56+5:30
गुन्हेगारी टोळ्यांवर विशेष नजर, गुन्हेगारांना उमेदवारीचे डोहाळे

निवडणुकीमुळे १२०९ सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवाया, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती
कोल्हापूर : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. नगरपालिका निवडणुकांपासूनच पोलिसांची सराईत गुन्हेगारांवर नजर होती. दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या १२०९ सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. याशिवाय गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी पोलिसांची अवैध व्यावसायिक आणि रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर करडी नजर आहे. नगरपालिका निवडणुकांपूर्वीच पोलिसांनी सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या होत्या. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने या कारवायांची व्याप्ती वाढली आहे. यापूर्वी निवडणुकांमध्ये गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींसह दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईतांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत.
मटका, जुगार, क्लब, गावठी दारूची निर्मिती, तस्करी, विक्री याशिवाय गांजा आणि इतर अमली पदार्थांच्या विक्रीवर पोलिसांची नजर आहे. अवैध व्यावसायिकांना नोटिसा पाठवून सक्त सूचना दिल्या आहेत. समजपत्र देणे, चांगल्या वर्तनाचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याच्या कारवाया केल्या आहेत. निवडणुकांच्या काळात कारवायांची संख्या आणखी वाढवणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
अशा आहेत कारवाया
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम - आरोपी संख्या
- कलम १२६, १२७ (सार्वजनिक ठिकाणी शांतता राखणे) : ५२०
- कलम १२९ (प्रतिज्ञापत्र घेणे) : ५४
- कलम १६३ (ब) (गैरप्रकार रोखणे) : ९४
- कलम १६८ (संभाव्य गुन्हे टाळण्यासाठी खबरदारी) : ४१२
- मुंबई पोलिस कायदा कलम ५५ आणि ५६ नुसार पोलिसांनी आठ सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.
एमपीडीएअंतर्गत कारवाया
इचलकरंजी पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत एका टोळीवर कारवाई केली असून, इतर पोलिस ठाण्यांनाही सराईत टोळ्यांवर एमपीडीएअंतर्गत कारवायांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या आहेत.
विभागनिहाय कारवाया
विभाग - संख्या
शहर - १२४
करवीर - ३४६
शाहूवाडी - ६२
जयसिंगपूर - १४९
इचलकरंजी - ३४३
गडहिंग्लज - १८५
गुन्हेगारांना उमेदवारीचे डोहाळे
खंडणी, अपहरण, मारामारी, फसवणूक, टोळी युद्धातील अनेक गुन्हेगार उमेदवारी मिळविण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे ठाण मांडून आहेत. अनेक गुन्हेगारांनी त्यांच्या वॉर्डमध्ये प्रचाराला सुरुवात केली असून, पैशांचा वारेमाप वापर केला जात आहे. अशा इच्छुकांकडून निवडणुकीत गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी त्यांच्यावर नजर राहणार असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले.
गेल्या निवडणुकीत १७ गुन्हे
कोल्हापूर महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत आचारसंहिता भंग आणि कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने १७ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी १३ गुन्ह्यांच्या खटल्यांचे कामकाज सुरू आहे. एका गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झाली. तीन गुन्हे रद्द केल्याची माहिती पोलिसांनी दिली.