Kolhapur: 'चंदगड'मध्ये 'गज'संकट?, शेतकरी झाले हवालदिल; हत्तींना रोखणे वनविभागासमोर मोठं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:27 IST2026-01-09T14:26:31+5:302026-01-09T14:27:57+5:30
हत्तींसह गवे, रानडुक्कर व इतर प्राण्यांनी प्रचंड नुकसान करत शेतकऱ्यांना घाईला आणले

Kolhapur: 'चंदगड'मध्ये 'गज'संकट?, शेतकरी झाले हवालदिल; हत्तींना रोखणे वनविभागासमोर मोठं आव्हान
निंगाप्पा बोकडे
चंदगड : तालुक्यातील विविध भागांत चार-पाच हत्तींना आवरताना पाटणे व चंदगड वनविभागाची दमछाक होते. त्यामुळे वनविभाग वेळीच अलर्ट न झाल्यास कणकुंबी भागातील बारा हत्तींचा कळप चंदगड तालुक्यात शिरला तर मात्र अस्मानी संकट तालुक्यावर घोंगावू शकते. त्यातून शेतकऱ्यांना वाचविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे टाकणार आहे.
तालुक्यातील जंगमहट्टी धरण, कलिवडे, आंबेवाडी धरण, जेलुगडे, पार्ले, झेंडेवाडी, कळसगादे, पारगडच्या पायथ्याशी असलेल्या खामदळे, गुडवळे तसेच जांबरे, उमगाव, कानूर यासह अलिकडे अडकूर परिसर, चिंचणे, कामेवाडी भागात अण्णा, गणेशसह इतर हत्तीचा वावर आहे. भागातील शेतकऱ्यांना या हत्तींसह गवे, रानडुक्कर व इतर प्राण्यांनी प्रचंड नुकसान करत घाईला आणले आहे.
रोजच्या त्रासामुळे काहींनी शेतीच पड पाडली आहे. पण ज्यांचा चारितार्थ शेतीवरच अवलंबून आहे त्यांनी मात्र शासनाची तुटपुंजी नुकसान भरपाई घेत आपला पारंपरिक शेती व्यवसाय सुरूच ठेवला आहे. पण आता खानापूर तालुक्यातील कणकुंबी भागात मादी, टस्कर व पिलांचा समावेश असलेला बारा हत्तींचा कळप धुमाकूळ घालत असल्याची माहिती समोर आली आहे.
पूर्वी याच भागातून चंदगड, दोडामार्ग व परत उलटा प्रवास करणाऱ्या चार-पाच हत्तींनी तिन्ही तालुक्यात शेतकऱ्यांना पुरे करून सोडले असताना या बारा हत्तींच्या कळपाला तिकडेच थोपविले नाहीतर मात्र चंदगड, दोडामार्ग तालुक्यातील वनविभागाची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे त्यांनी आताच या अस्मानी संकटाला रोखण्यासाठी संयुक्त मोहीम राबवत बंद केलेली हत्ती मित्र संकल्पना पुन्हा नव्याने सुरू करून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोलीक येथील खिंडीजवळ कर्मचारी लक्ष ठेवून
बारा हत्तींच्या कळपाविषयी माहिती मिळताच त्यांचा मार्ग असलेल्या कोलीक येथील खिंडीजवळ कर्मचारी, हत्ती हकारा गटातील कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. तसेच तिथ लावण्यासाठी आवश्यक कॅमेऱ्याची उपवनसंरक्षकांकडे मागणी केली असून आम्ही अलर्ट असल्याचे पाटणे वनविभागाच्या वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांनी सांगितले.
विधानसभेतही आवाज
वन्यप्राण्यांपासून शेती, शेतकऱ्यांना वाचवा म्हणून राज्याचे वनमंत्री व विधानभवनात मी स्वतः अनेकवेळा आवाज उठविला असून या प्रश्नीही मी गप्प बसणार नसल्याचे आमदार शिवाजी पाटील यांनी सांगितले.
कायमचा बंदोबस्त कधी?
खानापूर, दोडामार्ग व चंदगड तालुक्यातील वनविभागात म्हणावा तसा समन्वय नाही. प्रत्येकजण आपल्या हद्दीतून हत्तींना हाकलून लावून जबाबदारी झटकून देत आहेत. हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे