Kolhapur News: स्वत:च्या चितेची तयारी केली, अन् वृद्ध दाम्पत्याने आपली जीवनयात्रा संपवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 11:19 IST2023-06-22T11:18:53+5:302023-06-22T11:19:57+5:30
आजारपणास कंटाळून घेतला टोकाचा निर्णय

Kolhapur News: स्वत:च्या चितेची तयारी केली, अन् वृद्ध दाम्पत्याने आपली जीवनयात्रा संपवली
कळे : वेतवडे (ता. पन्हाळा) येथील एका वृद्ध दाम्पत्याने मंगळवारी आजारपणास कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. महादेव दादू पाटील (वय ७५) व द्वारकाबाई महादेव पाटील (७०) अशी त्यांची नावे आहेत. आत्महत्येपूर्वी त्यांनी स्वत:च्या चितेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करुन शेतात ठेवली होती.
याबाबतची वर्दी मुलगा आकाराम महादेव पाटील यांनी कळे पोलिस ठाण्यात दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कळे पोलिस पुढील तपास करत आहेत.
याबाबत माहिती अशी, घरची परिस्थिती बेताची असणारे महादेव पाटील व त्यांची पत्नी द्वारकाबाई पाटील हे वेतवडे येथील एक गरीब दाम्पत्य होते. ते आजाराने त्रस्त होते. या आजारपणास कंटाळून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला त्यांनी घेतला. आणि राहत्या घराच्या माळ्यावरील तुळईस नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दोघांनी आपण मृत झाल्यानंतर अग्नी देण्यासाठी शेतातील एका कोपऱ्यात आत्महत्येच्या दिवशी मंगळवारी सायंकाळी जागा केली. अग्नी देण्यासाठी लाकडे गोळा करून ठेवली होती. त्यांनी मध्यरात्री आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.