प्रशांत कोरटकर पसार, अटकेसाठी कोल्हापूर पोलिस नागपूरकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:09 IST2025-02-27T12:09:13+5:302025-02-27T12:09:43+5:30

कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर (रा. नागपूर ) याच्या अटकेसाठी जुना ...

Prashant Kortkar who threatened Indrajit Sawant and single mention of Shivaji Maharaj Kolhapur Police left for Nagpur for arrest | प्रशांत कोरटकर पसार, अटकेसाठी कोल्हापूर पोलिस नागपूरकडे रवाना

प्रशांत कोरटकर पसार, अटकेसाठी कोल्हापूर पोलिस नागपूरकडे रवाना

कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर (रा. नागपूर) याच्या अटकेसाठी जुना राजवाडा पोलिसांचे एक पथक बुधवारी (दि.२६) सकाळी नागपूरकडे रवाना झाले. पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पाच पोलिसांचा समावेश आहे. 

पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोबाइल स्विचऑफ असल्याने तो लपलेल्या ठिकाणाची माहिती मिळालेली नाही. त्याच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला आहे. समन्वयातून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी सकाळी कोरटकर याच्या घरासमोर काही तरुणांनी घोषणाबाजी केली. कायदासुव्यवस्था राखण्यासाठी त्याच्या घरासमोर बंदोबस्तात तैनात केल्याचे नागपूर पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या कोरटकरचे करायचे काय, खाली डोके वर पाय, जातीयवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा गगनभेदी घोषण देत बुधवारी कोल्हापूर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी कोरटकरचा जाहीर निषेध केला. सरकारने कोरटकरवर कारवाई करावी, अन्यथा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही विविध संघटनांनी केली.

इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना कोणी पकडून दिले, याचा वस्तुनिष्ठ इतिहास नुकताच मांडला. यावरून प्रशांत कोरटकर या व्यक्तीने सोमवारी मध्यरात्री फोन करून घरात घुसून मारण्याची धमकी दिली. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात आम्ही भारतीय लोक आंदोलनच्या वतीने कोरटकरविरोधात आंदोलन करण्यात आले. चंद्रकांत सूर्यवंशी, चंद्रकांत यादव, राजू लाटकर, अनिल चव्हाण, शिरीष भोसले, दिलीप सावंत, रवी चव्हाण उपस्थित होते.

विषारी प्रवृत्ती वेळीच ठेचा

प्रशांत कोरटकरचा मिरजकर तिकटी येथे मावळा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी प्रवृत्ती वाढू द्यायची नाही, ही आपली जबाबदारी आहे. ही विषारी प्रवृत्ती वेळीच ठेचली नाही, तर फोफावेल. मात्र, सरकारच अशा जातीयवादी शक्तींना पाठबळ देत असून, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, ॲड. अभिषेक मिठारी, उमेश पोवार, भारती पोवार, संभाजी जगदाळे, दिलीप सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शिवाजी पेठेत आंदोलन

प्रशांत कोरटकरचा शिवाजी पेठेतील पदाधिकाऱ्यांनी निवृत्ती चौकातील अर्ध शिवाजी पुतळा येथे जाहीर निषेध केला. यावेळी शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष राहुल इंगवले, माजी अध्यक्ष योगेश इंगवले, अक्षय मोरे, लालासाहेब गायकवाड, राहुल जरग उपस्थित होते.

Web Title: Prashant Kortkar who threatened Indrajit Sawant and single mention of Shivaji Maharaj Kolhapur Police left for Nagpur for arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.