प्रशांत कोरटकरला उद्या न्यायालयात हजर करणार, कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती
By उद्धव गोडसे | Updated: March 24, 2025 19:27 IST2025-03-24T19:24:49+5:302025-03-24T19:27:14+5:30
आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई करणार

प्रशांत कोरटकरला उद्या न्यायालयात हजर करणार, कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकर (रा. नागपूर) याला कोल्हापूरपोलिसांनी अटक केली. तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथील रेल्वे स्टेशनजवळ त्याला आज, सोमवारी (दि. २४) दुपारी ताब्यात घेतले.
उद्या, मंगळवारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. तसेच या काळात त्याला आश्रय देणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
कोरटकरने इतिहास संशोधक सावंत यांना फोन करून धमकावले होते. याबाबत कोल्हापुरातील जुना राजवाडा आणि नागपुरातील बेलतरोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. कोल्हापूर पोलिसांनी गेल्या महिनाभरात नागपूरसह मुंबई, चंद्रपूर आणि इंदौर येथे त्याचा शोध घेतला होता. अखेर तेलंगणात मंचरियाल येथील रेल्वे स्टेशनजवळ तो पोलिसांच्या हाती लागला.
महिनाभर पोलिसांना गुंगारा
गुन्हा दाखल होताच पसार झालेल्या कोरटकरने पोलिसांना महिनाभर गुंगारा दिला. या काळात त्याने कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळवला. पोलिस आणि सरकारी वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तीवादानंतर त्याचा अंतरिम जामीन रद्द झाला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तत्पूर्वीच त्याला अटक झाल्याने न्यायालयाने त्याचा अर्ज रद्द केला.