प्रशांत कोरटकर याने पसार काळात दोन वाहनांचा केला वापर, पोलिस चौकशीत समोर आली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 11:58 IST2025-03-28T11:56:03+5:302025-03-28T11:58:31+5:30

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत ...

Prashant Koratkar, who threatened history researcher Indrajit Sawant by making objectionable statements about great men, was produced in court again today after his police custody expired | प्रशांत कोरटकर याने पसार काळात दोन वाहनांचा केला वापर, पोलिस चौकशीत समोर आली माहिती

प्रशांत कोरटकर याने पसार काळात दोन वाहनांचा केला वापर, पोलिस चौकशीत समोर आली माहिती

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरची पोलिस कोठडीची मुदत आज, शुक्रवारी (दि. २८) संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले. यावेळी कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केलेला व्यक्ती आज पुन्हा न्यायालय परिसरात दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, पोलिस चौकशीत कोरटकरने पसार काळात दोन वाहनांचा वापर केल्याची तसेच त्याला मदत करणाऱ्या काही मित्रांची आणि नातेवाइकांची नावे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अटकेतील कोरटकर याची पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून कसून चौकशी केली. राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत बुधवारी रात्री सुरू केलेली चौकशी गुरुवारी पहाटेपर्यंत पुन्हा दिवसभरही सुरू राहिली.

न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो पसार काळात कुठे फिरला? त्याला कोणी मदत केली? त्याने कुठे मुक्काम केले? या काळात तो कोणाच्या संपर्कात होता? गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने मोबाइलमधील डेटा का डिलिट केला? पसार काळात तो इतरांच्या मोबाइलवरून कोणाच्या संपर्कात होता काय? याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पसार काळात पळून जाण्यासाठी त्याने स्वत:ची कार वापरली. त्यानंतर स्वत:च्या कारच्या नंबरवरून पोलिसांना सापडू नये, यासाठी एका मित्राची कार वापरली. गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही कार जप्त केल्या जाणार आहेत.

मदत करणाऱ्यांची नावे निष्पन्न

कोरटकरला कार देणाऱ्या मित्रासह मदत करणाऱ्या काही साथीदारांची नावे चौकशीत निष्पन्न झाली आहेत. यात काही नातेवाइकांचाही समावेश आहे. गरज पडल्यास त्यांचीही चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यासाठी काही दिवसांत पोलिसांचे एक पथक नागपूरला जाण्याची शक्यता आहे.

अडचणीच्या प्रश्नांवर मौन

अटक केल्यापासून कोरटकरने चौकशीत पोलिसांना सहकार्य केले आहे. मात्र, त्याच्या अडचणी वाढवणारे प्रश्न विचारताच तो मौन बाळगत आहे. त्याला बोलते करण्यासाठी पोलिस रात्रंदिवस चौकशी करीत आहेत. रात्री-अपरात्री कधीही प्रश्नांचा भडिमार सुरू होत असल्याने त्याची अस्वस्थता वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.

गांधीनगरात वैद्यकीय तपासणी

वैद्यकीय तपासणीसाठी गुरुवारी सकाळी त्याला गांधीनगर येथील प्राथमिक रुग्णालयात हजर केले. त्यानंतर दिवसभर चौकशीचे सत्र सुरू होते. पोलिस कोठडी संपत असल्याने शुक्रवारी दुपारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अजून तपास बाकी असल्याने पोलिसांकडून आणखी काही दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मागण्याची विनंती न्यायाधीशांकडे केली जाऊ शकते.

Web Title: Prashant Koratkar, who threatened history researcher Indrajit Sawant by making objectionable statements about great men, was produced in court again today after his police custody expired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.