प्रशांत कोरटकरला पोलिसांनी कोल्हापुरात आणलं; महिनाभर गुंगारा देणारा शिवद्रोही जाळ्यात कसा अडकला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 09:37 IST2025-03-25T09:34:08+5:302025-03-25T09:37:19+5:30
कोल्हापूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर इंदौरला असणाऱ्या कोरटकरने आपली गाडी बदलली आणि चालकालाही माघारी पाठवून दिलं होतं.

प्रशांत कोरटकरला पोलिसांनी कोल्हापुरात आणलं; महिनाभर गुंगारा देणारा शिवद्रोही जाळ्यात कसा अडकला?
Kolhapur Prashant Koratkar: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला काल तेलंगणातून बेड्या ठोकल्यानंतर कोल्हापूरपोलिसांनी आज त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणलं आहे. कोरटकर याची वैद्यकीय चाचणी करून त्याला न्यायायलात हजर केलं जाणार आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या शिवछत्रपतींबद्दल विकृत वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळल्याने शिवप्रेमींकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. महिनाभर गुंगारा देणारा कोरटकर अखेर पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला, याची इनसाइड स्टोरीही आता समोर आली आहे.
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर अटकेच्या भीतीने प्रशांत कोरटकर फरार झाला होता. नागपूरमधून आधी चंद्रपूर, नंतर इंदूर आणि त्यानंतर तो थेट तेलंगणात पोहोचला होता. दरम्यानच्या काळात त्याने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला. मात्र कोल्हापूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर इंदूरला असणाऱ्या कोरटकरने आपली गाडी बदलली आणि चालकालाही माघारी पाठवून दिलं. त्यानंतर दुसऱ्या कारने तो तेलंगणाच्या दिशेने निघून गेला.
"प्रशांत कोरटकर काँग्रेस नेत्याकडे लपून होता"; भाजपचा गंभीर आरोप, म्हणाले, "त्याला वाचवण्यासाठी…"
कोल्हापूर पोलिसांनी भाड्याने घेतल्या दुचाकी!
प्रशांत कोरटकर तेलंगणाच्या दिशाने गेल्याचे एका टोलनाक्यावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पष्ट झाल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात त्याचा शोध सुरू केला होता. मात्र महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या पाहिल्यानंतर कोरटकर पुन्हा एकदा चकवा देण्याची शक्यता लक्षात घेऊन कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात तेथील दुचाकी भाड्याने घेतल्या. या दुचाकींवरून पोलिसांनी दोन ते तीन दिवस कोरटकरचा शोध घेतला. अखेर सोमवारी दुपारी तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथील रेल्वे स्टेशनपासून त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं.
दरम्यान, रात्रभर प्रवास करून मंगळवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास पोलिसांचे पथक कोल्हापुरात पोहोचले. यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे सीपीआरसह कसबा बावडा येथील जिल्हा न्याय संकुलाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. कोल्हापुरी चपलेने कोरटकरचे स्वागत करणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाल्याने त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवून खबरदारी घेतली आहे. आज जुना राजवाडा पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर प्रशांत कोरटकरला किती दिवसांची कोठडी सुनावण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.