प्रशांत कोरटकरने दिली धमकी, इंद्रजित सावंत यांनी तपासकामी कोल्हापूर पोलिसांकडे सादर केला मोबाइल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:11 IST2025-02-28T14:10:25+5:302025-02-28T14:11:21+5:30
कोरटकरचा सुगावा लागेना

प्रशांत कोरटकरने दिली धमकी, इंद्रजित सावंत यांनी तपासकामी कोल्हापूर पोलिसांकडे सादर केला मोबाइल
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर याला कधी अटक करणार? असा सवाल शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलिसांना विचारला. इंद्रजित सावंत यांनी तपासकामी मोबाइल पोलिसांकडे सादर केला. पुराव्यांमध्ये छेडछाड होण्यापूर्वी कोरटकरला अटक व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, कोरटकरच्या अटकेसाठी नागपूरला गेलेल्या पोलिसांच्या पथकाला अजूनही त्याचा सुगावा लागलेला नाही.
मंगळवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात कोरटकर याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना झाले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोरटकरला अटक करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या. त्यानंतरही गेल्या चार दिवसांपासून कोरटकर पसार आहे. त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी गुरुवारी जुना राजवाडा पोलिसांकडे केली. यावेळी इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.
मोबाइल घ्या; तपास करा
सावंत यांनी तपासकामी त्यांचा मोबाइल जुना राजवाडा पोलिसांकडे सादर केला. कोरटकर याला तातडीने अटक झाली नाही तर तो पुरावे नष्ट करू शकतो. पुराव्यांशी छेडछाड करू शकतो. त्यामुळे त्याला त्वरित अटक करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.
कोरटकरचा सुगावा लागेना
मोबाइल लोकेशनवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे शेवटचे लोकेशन नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात आले होते. त्यानंतर त्याचा मोबाइल बंदच असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचे नातेवाईक आणि मित्रांकडे चौकशी सुरू आहे. इंदोर आणि पुसद येथे तो गेल्याच्या चर्चा गुरुवारी दिवसभर सुरू होत्या.