प्रशांत कोरटकर खासगी नाही तर पोलिसांच्या वाहनांतूनच रवाना, पोलिस निरीक्षक झाडे यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 12:27 IST2025-04-12T12:27:16+5:302025-04-12T12:27:56+5:30
कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (रा. नागपूर) याची कळंबा ...

प्रशांत कोरटकर खासगी नाही तर पोलिसांच्या वाहनांतूनच रवाना, पोलिस निरीक्षक झाडे यांनी दिली माहिती
कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (रा. नागपूर) याची कळंबा कारागृहातून शुक्रवारी (दि.११) दुपारी सुटका करण्यात आली. तब्बल १६ दिवस तो कारागृहात होता. जुना राजवाडा पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात त्याला कोल्हापूर विमानतळावर सोडण्यात आले. तेथून तो मुंबईकडे रवाना झाला.
न्यायालयाने अटी-शर्तींसह ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोरटकरचा जामीन मंजूर केला होता. मात्र, कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने त्याचा कारागृहातील दोन दिवस मुक्काम वाढला होता. अखेर शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच कारागृह परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला.
कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या प्रशासनाने दहाहून अधिक कर्मचारी त्याला बाहेर काढण्यासाठी तैनात केले होते. कारागृहातील अंडासेलमधून दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्याला बाहेर काढले. त्या वेळी जुना राजवाडा पोलिसांची वाहने कारागृहाच्या प्रवेशद्वाराच्या आत लावली होती. कारागृहातून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला कडक पोलिस बंदोबस्तात बाहेर आणण्यात आले.
कारागृहाबाहेर पोलिसांचे जलद कृती दलही तैनात केले. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक संतोष गळवे, राजारामपुरीचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह ६० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. अगदी दोन मिनिटे कालावधीत पोलिसांनी कारागृहातून त्याला वाहनांतून मुख्य रस्त्यावर आणले. तेथून कोल्हापूर विमानतळावर तातडीने नेण्यात आले. त्या वेळी सुरक्षेच्या कारणासाठी विमानतळ मार्गावरही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जामीन
न्यायालयाने कोरटकरला ९ एप्रिलला जामीन मंजूर केला होता. मात्र, जामिनाचे पत्र कळंबा कारागृहात पोहोचू शकले नव्हते, त्यामुळे त्याची सुटका होऊ शकली नव्हती. कोरटकरच्या वकिलांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात कागदपत्रांची पूर्तता केली. न्यायालयाने दिलेली जामिनाची ऑर्डर, जात मुचलक्याचे पैसे भरलेली कागदपत्रे, पोलिस संरक्षण मिळण्यासाठीचा अर्ज यांसह अन्य कागदपत्र न्यायालयासमोर ठेवली. त्यानंतर जामिनाची ऑर्डर घेऊन कोरटकरचे सहायक वकील कारागृह प्रशासनाकडे गेले. त्यानंतर कोरटकरची जामिनावर मुक्तता झाली.
पोलिसांच्या वाहनांतूनच रवाना
कारागृहातून बाहेर पडताना एक खासगी चारचाकी वाहन पोलिसांच्या ताफ्यात होते. मात्र, या वाहनातून त्याला नेण्यात आले नाही. पोलिसांच्या वाहनातून त्याला कोल्हापूर विमानतळापर्यंत नेल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी सांगितले.
अटींचे पालन करण्याच्या सूचना
फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणू नये. पुरावे नष्ट करू नयेत. चौकशीत पोलिसांना सहकार्य करावे. पोलिसांच्या परवानगी शिवाय बाहेरगावी जाऊ नये, अशा अटींचे पालन करण्याच्या सूचना त्याला न्यायाधीशांनी दिल्या आहेत.