आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शासकीय रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित, व्हेन्टिलेटर पडले बंद; मोबाईलच्या प्रकाशात उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:01 IST2025-06-24T12:00:59+5:302025-06-24T12:01:23+5:30
डॉक्टर, नातेवाइकांची धांदल उडाली

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शासकीय रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित, व्हेन्टिलेटर पडले बंद; मोबाईलच्या प्रकाशात उपचार
कोल्हापूर : येथील सीपीआरच्या अतिदक्षता विभागातील वीज तासाभरासाठी खंडित झाल्याने डॉक्टर आणि नातेवाइकांची धांदल उडाली. जनरेटरही खराब झाल्याने अनेक इलेक्ट्रिक उपकरणे बंद पडली आणि नंतर मात्र गोंधळ उडाला. सुदैवाने तासाभरात वीजपुरवठा सुरळीत झाला आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. मात्र, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे.
सर्व सीपीआरचाच वीजपुरवठा सोमवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेत बंद पडला. आधीच या ठिकाणी नूतनीकरणाची सुरू असलेली कामे, त्यात पडणारा पाऊस, झालेला अंधार यामुळे रुग्ण आणि नातेवाईक हवालदिल झाले होते. अशातच अतिदक्षता विभागातीलही वीज खंडित झाल्याने अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरसह अन्य इलेक्ट्रिक उपकरणेही बंद पडू लागली. त्यामुळे या उपकरणांवर उपचार घेणारे रुग्ण अक्षरशः घामाघूम झाले आणि डॉक्टरांचीही धावपळ उडाली. लवकर वीज न आल्याने जी उपकरणे बॅटरी बॅकअपवर सुरू होती, त्या उपकरणांचे बॅटरी बॅकअपचेही अलार्म वाजू लागल्याने अतिदक्षता विभागात एकच गोंधळ उडाला.
अशा गंभीर परिस्थितीतही रुग्णांचे नातेवाईक,डाॅ क्टर, वैद्यकीय कर्मचारी यांनी मोबाईलच्या प्रकाशात उपचार सुरू ठेवले. रुग्णांची प्रकृती ढासळू नये म्हणून डॉक्टर, नर्सेस आणि नातेवाइकांची मोठी धावपळ उडाली. प्रसंगावधान राखत तातडीने संबंधित यंत्रणाशी संपर्क साधण्यात आला आणि तासाभराने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. ही माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठही सीपीआरमध्ये दाखल झाले.
फारसे काही गंभीर झाले नसल्याचा आव
अशाही परिस्थितीत याबाबत चौकशीसाठी फोन केल्यानंतर एका वरिष्ठांनी असे काही झाले नाही असे बेधडक सांगून टाकले, तर दुसऱ्या डॉक्टरांनी पाच, सहा मिनिटांसाठी वीज गेल्याचे कबूल केले. तासभर अतिदक्षता विभागातील वीज गेली तरी फारसे काही गंभीर झाले नसल्याचे चित्र निर्माण करण्यात येत होते.