Kolhapur Politics: कागल, गडहिंग्लजमध्ये भाजप-मुश्रीफ युती शक्य, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:02 IST2025-11-11T19:02:17+5:302025-11-11T19:02:57+5:30
Local Body Election: मुरगुडमध्ये मंडलिकांसोबत, चंदगडमध्ये मुश्रीफविरोधात

Kolhapur Politics: कागल, गडहिंग्लजमध्ये भाजप-मुश्रीफ युती शक्य, पण...
कोल्हापूर : कागल आणि गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जिल्हा पातळीवर ठरला असला तरी दोन दिवसांत मुंबईत याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. मात्र, मुरगुडमध्ये भाजपने संजय मंडलिक यांच्यासोबत युतीचा आणि चंदगडमध्ये राष्ट्रवादीच्याविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रभारी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, स्थानिक स्वराज्य समिती निवडणुकीची जबाबदारी असलेले महेश जाधव, माजी आमदार संजयबाबा घाटगे, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या उपस्थितीत पूर्व विभागाची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. या ठिकाणी भाजपने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे सर्वाधिकारी आमदार शिवाजी पाटील यांना देण्यात आले आहेत. गडहिंग्लजमध्ये भाजप काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. स्वाती कोरी यांनी गेल्या पंधरवड्यात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली होती. परंतु, या ठिकाणी राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी भाजपने केली आहे.
मुरगुडमध्ये संजय मंडलिक आणि भाजप अशी युती होणार असून राष्ट्रवादी तेथे विरोधात असेल तर कागलमध्ये भाजप मुश्रीफ यांच्यासोबत निवडणुकीत उतरणार आहे. मुरगुडमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमचा असेल असा प्रस्ताव भाजपने दिला आहे.
आजऱ्यातील नव्या, जुन्या भाजपमधील मिटेना
आजरा नगरपंचायतीसाठी अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखालील समविचार आघाडी निवडणूक लढवणार असून यामध्येच जुन्या भाजपच्या दोन इच्छुकांना संधी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. हा प्रस्ताव मान्य करून जुन्या भाजपवासीयांनी चराटी यांच्या आघाडीसोबत रहावे यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, हा प्रस्ताव अजूनही मान्य झाला नसून चराटी यांच्या आघाडीविरोधात येतील त्यांना सोबत घेऊन विरोधी आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.