Kolhapur: पंचगंगा प्रदूषणावरून 'स्वाभिमानी'कडून अधिकारी धारेवर, प्रदूषण मंडळाने घेतले दूषित पाण्याचे नमुने
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:34 IST2025-12-18T12:34:39+5:302025-12-18T12:34:59+5:30
प्रश्नांची सरबत्ती करत कारखानदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला

Kolhapur: पंचगंगा प्रदूषणावरून 'स्वाभिमानी'कडून अधिकारी धारेवर, प्रदूषण मंडळाने घेतले दूषित पाण्याचे नमुने
कुरुंदवाड : पंचगंगा नदी पात्रात दूषित पाणी आल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी बुधवारी सायंकाळी तेरवाड बंधारा येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच पाण्याचे नमुने घेतले.
दरम्यान दूषित पाण्याचे नमुने घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आल्याचे समजताच स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांनी बंधाऱ्यावर येऊन अधिकारी पाटील यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत कारखानदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.
यावेळी अधिकारी पाटील यांनी दूषित पाण्याचे नमुने घेतले असून त्याचा अहवाल येताच दोषींवर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांना अहवाल देण्यात येईल. तसेच नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.