Kolhapur: प्रभाग रचना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव, काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:59 IST2025-06-19T17:58:44+5:302025-06-19T17:59:02+5:30
प्रभाग रचनेचे काम दबावाखाली नको

Kolhapur: प्रभाग रचना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव, काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा आरोप
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रारूप प्रभाग रचना करत असताना कोणाच्याही राजकीय दबावाखाली करू नका, अशा मागणीचे निवेदन बुधवारी कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या माजी नगरसेवकांनी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना दिले.
काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी प्रशासक मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली, त्यावेळी शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी निवडणुकीसाठी प्रभाग रचना करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा थेट आरोप केला. कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जर असे कोणाच्या दबावाखाली प्रभाग रचना केली जाणार असेल, तर ती आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
प्रभाग रचना कोणत्याही राजकीय दबावाखाली होऊ नये. तसेच प्रभाग रचनेत पारदर्शकता असावी, अशी आमची मागणी आहे. परंतु आमच्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत. काँग्रेसच्या काही विशिष्ट माजी नगरसेवकांचे प्रभाग फोडताना दुजाभाव करून ते कसे अडचणीत येतील यादृष्टीने अधिकाऱ्यांवर दबाव आणले जात आहेत. प्रशासक म्हणून आपणही ते खपवून घेऊ नये, असे चव्हाण यांनी सांगितले.
शिष्टमंडळात सचिन चव्हाण, भूपाल शेटे, संजय मोहिते, जय पटकारे, श्रावण फडतारे, शोभा कवाळे, प्रतापसिंह जाधव, इंद्रजित बोंद्रे या नगरसेवकांसह दुर्वास कदम, शिवानंद बनसोडे, संजय लाड, दिग्विजय मगदूम, अभिजित देठे, फिरोज सौदागर, उमेश पोवार, रियाज सुभेदार यांचा समावेश होता.
फायरमनना कायम सेवेत सामावून घ्या
महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाकडे मानधनावर काम करणाऱ्या फायरमन यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. आकृतिबंधानुसार फायरमनची १३० पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात कायम १५ व ठोक मानधनावरील ४३ फायरमन सेवेत आहेत. ७२ पदे रिक्त आहेत. म्हणूनच जे फायरमन ठोक मानधनावर काम करीत आहेत, त्यांना सेवेत कायम करावे, असे निवेदनात म्हटले आहे.