कोल्हापुरात बदलीसाठी पोलिसाने पोलिसाकडूनच उकळली खंडणी; हेडक्लार्क अटकेत, महिलेवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 13:01 IST2025-07-26T13:01:20+5:302025-07-26T13:01:46+5:30

पोलिस दलात खळबळ उडाली

Policeman extorts bribe from police for transfer in Kolhapur Head clerk arrested, woman charged | कोल्हापुरात बदलीसाठी पोलिसाने पोलिसाकडूनच उकळली खंडणी; हेडक्लार्क अटकेत, महिलेवर गुन्हा 

कोल्हापुरात बदलीसाठी पोलिसाने पोलिसाकडूनच उकळली खंडणी; हेडक्लार्क अटकेत, महिलेवर गुन्हा 

कोल्हापूर : आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या पोलिस कॉन्स्टेबलकडून ३० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील हेडक्लार्क आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील महिला पोलिस कर्मचाऱ्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

हेडक्लार्क संतोष मारुती पानकर (वय ४५, रा. हनुमान गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक केली. पानकर याच्यासह धनश्री उदय जगताप (रा. कसबा बावडा) हिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षकांनी मंजूर केलेल्या बदली अर्जाची प्रक्रिया राबविण्यासाठी हेडक्लार्कनेच खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पोलिस कॉन्स्टेबल रितेश मनोहर ढहाळे (वय ३१, सध्या रा. कोल्हापूर, मूळ रा. वसाळी, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची २० जुलै २०२५ रोजी चंदगड पोलिस ठाण्यात बदली झाली होती. गावाकडे वडील आजारी असल्याने त्यांनी नाशिक जिल्ह्यात बदली मिळावी, असा अर्ज पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे केला होता. अधीक्षकांनी अर्ज मंजूर करून तो पुढील कार्यवाहीसाठी हेडक्लार्क पानकर याच्याकडे पाठवला. 

पानकर याने कॉन्स्टेबल धनश्री जगताप हिच्याकरवी ढहाळे यांना निरोप पाठवला. बदलीसाठी ३० हजार रुपये द्यावे लागतील. अन्यथा बदली होणार नाही, अशी भीती त्याने घातली. त्यानंतर बुधवारी (दि. २३) सायंकाळी जगताप हिच्या बँक खात्यात ऑनलाईन ३० हजार रुपये स्वीकारले. जगताप हिने यातील २० हजार रुपये पुढे पानकर याच्या खात्यावर पाठवले.

खंडणीचा गुन्हा

बदलीसाठी हेडक्लार्कनेच पैसे स्वीकारल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांनी पानकर याला कार्यालयात बोलवून घेतले. त्याची कानउघडणी करून शाहूपुरी पोलिसांना त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी शुक्रवारी (दि. २५) मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास गुन्हा दाखल करून पानकर याच्यावर अटकेची कारवाई केली. जगताप हिला अटक होण्याची शक्यता आहे.

Web Title: Policeman extorts bribe from police for transfer in Kolhapur Head clerk arrested, woman charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.