गुड न्यूज: कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांना नवीन घरे अन् मिळणार चकचकीत कार्यालयेही, १८५ कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 15:03 IST2025-01-01T15:03:36+5:302025-01-01T15:03:58+5:30
कागल, कळेसाठी नवीन इमारती ; जुना बुधवार, इचलकरंजीतील घरे मिळणार

गुड न्यूज: कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांना नवीन घरे अन् मिळणार चकचकीत कार्यालयेही, १८५ कोटींचा खर्च
कोल्हापूर : नव्या वर्षात पोलिसांना नवीन ६७८ घरे मिळणार, तसेच शहापूर आणि कुरुंदवाड पोलिस ठाण्यांचा कारभार नवीन इमारतींमधून चालणार आहे. कागल आणि कळे पोलिस ठाण्यांसाठी लवकरच नवीन इमारतींचे बांधकाम होणार आहे. मुख्यालयात पोलिस क्लबलाही मंजुरी मिळाली आहे.
जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन इमारतींमधूनच पोलिस ठाण्यांचा कारभार चालतो. पोलिसांची शासकीय घरेही अपुऱ्या जागेतील आणि जीर्ण आहेत. पोलिस दलाचे आधुनिकीकरण होत असतानाच नवीन इमारतींचे बांधकाम करण्यास प्राधान्य दिले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहरातील जुना बुधवार पेठ, पोलिस मुख्यालय आणि लक्ष्मीपुरी येथील पोलिसांच्या घरांचे बांधकाम सुरू आहे. इचलकरंजीतील कलानगर येथील घरांचेही काम जवळपास पूर्ण झाले आहे. लवकरच इचलकरंजी आणि जुना बुधवार पेठेतील प्रशस्त फ्लॅट पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी उपलब्ध होणार आहेत. वर्षअखेरपर्यंत पोलिस मुख्यालय आणि लक्ष्मीपुरीतील फ्लॅट तयार होणार आहेत.
पोलिस मुख्यालयात पोलिस क्लबच्याही बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. यात अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानांची व्यवस्था होणार आहे. कुरुंदवाड आणि शहापूर पोलिस ठाण्यांच्या नवीन इमारती तयार झाल्या आहेत. येणाऱ्या दोन-तीन महिन्यांत त्यांचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. कागल आणि कळे पोलिस ठाण्यांच्या नवीन इमारतींना मंजुरी मिळाली असून, नव्या वर्षात बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
१८५ कोटींचा खर्च
पोलिसांच्या घरांसाठी १८५ कोटी ८७ लाखांचा खर्च केला जात आहे. जुना बुधवार पेठेतील घरांसाठी ३७ कोटी २४ लाख रुपये, पोलिस मुख्यालयातील घरांसाठी ७१ कोटी २८ लाख, लक्ष्मीपुरीतील घरांसाठी ३४ कोटी ६२ लाख, तर इचलकरंजीतील घरांसाठी ४२ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
प्रशस्त घरांचे स्वप्न साकार
अनेक वर्षे जुन्या आणि अडगळीच्या घरांमध्ये काढलेल्या पोलिसांना किमान ५३८ स्क्वेअर फुटांचे घर मिळणार आहे. इमारतींमध्ये हवेशीर फ्लॅट, प्रशस्त कॉमन एरिया, पार्किंग, मुलांसाठी खेळाचे मैदान अशा सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे पोलिस कुटुंबीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न नवीन वर्षात साकार होणार आहे.
६७८ फ्लॅट्सची निर्मिती
जुना बुधवार पेठ - १६८
पोलिस मुख्यालय - २०४
लक्ष्मीपुरी - ९६
इचलकरंजी (कलानगर) - २१०