प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी पोलिस पथके चंद्रपूरला, जामिनावर मुंबईत सोमवारी सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 11:59 IST2025-03-22T11:57:41+5:302025-03-22T11:59:14+5:30
कोल्हापूर : पसार झालेल्या प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी पोलिसांची पथके शुक्रवारी चंद्रपुरात पोहोचली. काही दिवस तो नागपुरातील घरी आल्यानंतर मिळालेल्या ...

प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी पोलिस पथके चंद्रपूरला, जामिनावर मुंबईत सोमवारी सुनावणी
कोल्हापूर : पसार झालेल्या प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी पोलिसांची पथके शुक्रवारी चंद्रपुरात पोहोचली. काही दिवस तो नागपुरातील घरी आल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चंद्रपुरकडे धाव घेतली आहे. त्यासाठी चंद्रपूर पोलिसांची मदत घेतली आहे.
गुरुवारी कोरटकर याच्या नागपूर येथील घरातून पत्नीचा जबाब नोंदविला. त्या ठिकाणी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार तो चंद्रपुरात असल्याची माहिती मिळाली. जुना राजवाडा पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर आणि चंद्रपूर पोलिसांचे एक पथकाला सोबत घेऊन त्याचा शोध सुरू केला आहे. मात्र, तो पोलिसांना अजूनही गुंगारा देत आहे.
धमकी प्रकरणात १ मार्चला त्याला अंतरिम जामीन मिळाल्याने तो घरी आला होता. मात्र, त्यानंतर तो घरी आलेला नाही. या कालावधीत त्याचे वास्तव्य चंद्रपूर परिसरात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एक पथक तेथे रवाना झाले आहे. त्यासह कोरटकरच्या नातेवाइकांकडे आणि मित्रांकडे चौकशी सुरू आहे. पथकात सहा पोलिसांचा समावेश असून, त्यात एक पोलिस उपनिरीक्षक आहे. अंतरिम जामीन मिळाल्याच्या कालावधीत तो कोणाच्या संपर्कात होता, त्याची माहिती घेतली जात आहे.
जामिनावर मुंबईत सोमवारी सुनावणी
कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन रद्द केल्याने प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी शुक्रवारी दाखल केलेली याचिका तहकूब करून सोमवारी (दि.२४) न्यायालयासमोर सुनावणी होत आहे. अटक टाळण्यासाठी कोरटकरने प्रयत्न सुरू केले आहेत.