Kolhapur: पोलिस नाईक चेतन घाटगे अटकेत, जबाब घेताना केला होता अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:45 IST2025-04-09T11:45:24+5:302025-04-09T11:45:56+5:30
बक्कल नंबर ४२०

Kolhapur: पोलिस नाईक चेतन घाटगे अटकेत, जबाब घेताना केला होता अल्पवयीन मुलीचा विनयभंग
कोल्हापूर : लैंगिक अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीचा जबाब घेताना तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक चेतन दिलीप घाटगे (वय ३९, मूळ रा. नेज, ता. हातकणंगले, सध्या रा. इंगळेनगर, कोल्हापूर) याला शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी (दि. ८) सकाळी आजरा येथून अटक केली. गुरुवारी (दि. ३) रात्री गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता.
शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्यातील पीडित मुलीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिस नाईक घाटगे हा बुधवारी रात्री खासगी रुग्णालयात गेला होता. त्यावेळी त्याने पीडित मुलीला स्वत:चा मोबाइल नंबर दिला.
भिऊ नको. तू माझी मैत्रीण आहेस. काही अडचण आली तर मला फोन कर, असे म्हणत त्याने मुलीच्या अंगाला स्पर्श केला. याबाबत पीडित मुलीने फिर्याद देताच तो पळून गेला होता. गुन्हा दाखल होताच पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्याचे निलंबन केले. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली.
बक्कल नंबर ४२०
राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा घाटगे याच्यावर यापूर्वी दाखल झाला होता. त्या वेळी त्याचे निलंबन झाले होते. त्या गुन्ह्यातून त्याची निर्दोष सुटका झाली होती. त्यानंतर त्याला सेवेत घेतले होते. आता पुन्हा पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्याचा बक्कल नंबर ४२० असा आहे.