Kolhapur-Shahuwadi murder case: जेवण न दिल्यानेच कंक दाम्पत्याचा खून, हल्लेखोर विजय गुरवला पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:32 IST2025-11-03T17:30:42+5:302025-11-03T17:32:24+5:30
लाकडी दांडक्याने दोघांचा खून

Kolhapur-Shahuwadi murder case: जेवण न दिल्यानेच कंक दाम्पत्याचा खून, हल्लेखोर विजय गुरवला पोलिस कोठडी
कोल्हापूर : जेवण न दिल्याच्या रागातून गोळीवणे (ता. शाहूवाडी) येथील कंक दाम्पत्याचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. लाकडी दांडक्याने मारहाण करून दोघांचा खून करणारा विजय मधुकर गुरव (वय ४०, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी) याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याच्या अन्य दोन साथीदारांचा गुन्ह्यातील सहभाग तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
हल्लेखोर विजय गुरव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, चोरी, घरफोडी, पोक्सो असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. १५ ऑक्टोबरला तो गोळीवणे परिसरात फिरत होता. कंक दाम्पत्याच्या घरी जाऊन त्याने जेवण मागितले. मात्र, जेवण देण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने लाकडी दांडक्याने कंक दाम्पत्याला बेदम मारहाण केली. त्याच मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. हल्लेखोर गुरव याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांचा गुन्ह्यातील सहभाग तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
अनेक प्रश्नांचा होणार उलगडा
कंक दाम्पत्याचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी कसे काय पडले होते? त्यांचे हात-पाय हल्लेखोराने तोडले, की जंगली प्राण्यांनी तोडले? मृतदेहांवरील ओरखडे प्राण्यांचे आहेत की हल्लेखोरांनी केलेल्या जखमांचे आहेत? जेवण न दिल्याच्या रागातूनच खून झाला की आणखी काही कारण होते? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा पोलिसांच्या तपासातून होणार आहे.
गुरव हा सराईत गुन्हेगार
अटकेतील विजय गुरव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर शाहूवाडी, राजारामपुरी, शहापूर, सांगली, जत पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून तो बाहेर आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपासात तो माहिती लपवत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.