Kolhapur Crime: बिबट्याच्या हल्ल्यात नाही, तर...; कंक दाम्पत्याच्या मृत्यूचा उलगडा करण्यात पोलिसांना यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:13 IST2025-10-31T18:03:34+5:302025-10-31T18:13:30+5:30
पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे, एक संशयित ताब्यात, आज उलगडा होण्याची शक्यता

Kolhapur Crime: बिबट्याच्या हल्ल्यात नाही, तर...; कंक दाम्पत्याच्या मृत्यूचा उलगडा करण्यात पोलिसांना यश
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील परळेनिनाई येथे गोळीवणे वस्तीवरील कंक दाम्पत्याच्या मृत्यूचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. निनो कंक आणि रुक्मिणीबाई कंक यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला नसून, तो खूनच असल्याचे स्पष्ट होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे. आज या गुन्ह्याचा पूर्ण उलगडा होण्याची शक्यता आहे. पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे.
परळेनिनाई येथील गोळीवणे वस्तीवर राहणाऱ्या कंक दाम्पत्याचे मृतदेह १९ ऑक्टोबरला आढळले होते. जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही शक्यता फेटाळली होती. त्यामुळे कंक दाम्पत्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत संभ्रम होता. पोलिसांनी विविध शक्यता गृहित धरून तपासाला सुरुवात केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन पथके शाहूवाडीत तळ ठोकून आहेत. या पथकांनी मृत कंक दाम्पत्याच्या नातेवाईकांची चौकशी केली. गावातील काही व्यक्तींची चौकशी केली. यावेळी मिळालेल्या विसंगत माहितीवरून पोलिसांचा संशय बळावला. आठवडाभराच्या तपासानंतर अखेर रत्नागिरी येथून एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याने खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. या गुन्ह्यातील आणखी दोघांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
पूर्वीच्या वादातून कंक दाम्पत्याचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. दोन हल्लेखोरांनी निनू कंक यांचा खून करून मृतदेह जवळच धरणाच्या जलाशयात टाकला. वस्तीपासून काही अंतरावर रुक्मिणीबाई यांचा खून करून दोघांचा मृत्यू जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झाला असावा, असे भासविण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.
अनुत्तरीत प्रश्नांमुळे वाढला संशय
गोळीवणे वस्तीवर शेळ्या, मेंढ्या, कुत्रे असतानाही बिबट्याने कंक दाम्पत्यावर कसा हल्ला केला? या दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी कसे मिळाले? निनू कंक यांचा मृतदेह बिबट्याने धरणापर्यंत ओढत नेला असेल तर त्यांच्या अंगावर जखमा का नाहीत? प्राण्यांनी ओरबडल्याच्या खुना मृतदेहावर का नाहीत? अशा अनुत्तरीत प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेताना कंक दाम्पत्याच्या खुनाचा उलगडा झाला.
गाफील ठेवून केला तपास
बिबट्याच्या हल्ल्यात कंक दाम्पत्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्यावर जंगली प्राण्यांचा हल्ला झाला नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले होते. पोलिसांनी मात्र मौन बाळगून तपास सुरूच ठेवला. हल्लेखोरांना गाफील ठेवून केलेल्या तपासात अखेर पोलिसांना यश आले.