Kolhapur: पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, एएसआय यादव यांना शौर्य पदक प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:13 IST2025-07-30T12:11:48+5:302025-07-30T12:13:26+5:30

कुख्यात बिष्णोई टोळीतील गुन्हेगारांना केली होती अटक

Police Inspector Tanaji Sawant, ASI Namdev Yadav awarded gallantry medals | Kolhapur: पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, एएसआय यादव यांना शौर्य पदक प्रदान

Kolhapur: पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, एएसआय यादव यांना शौर्य पदक प्रदान

कोल्हापूर : कुख्यात बिष्णोई टोळीतील गुन्हेगारांना पुणे-बंगळुरू महामार्गावर पकडल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी शकुंतला दिगंबर सावंत आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक नामदेव नकुसाबाई महिपती यादव यांना पोलिस शौर्य पदकाने गौरविण्यात आले. मुंबईत राजभवन येथे मंगळवारी झालेल्या समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.

बिष्णोई टोळीतील गुन्हेगारांवर विविध राज्यांत खुनाचा प्रयत्न, सरकारी नोकरावर हल्ला, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे व त्याचा वापर करणे, दरोडा, अपहरण, खंडणी, जाळपोळ, बलात्कार असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०१७ पासून या टोळीतील अनेक गुन्हेगारांना फरार घोषित केले होते. २८ जानेवारी २०२० मध्ये गँगचा म्होरक्या श्यामलाल गोवर्धनराम पुनिया, श्रीराम पाचाराम बिष्णोई आणि श्रवणकुमार मनोहरलाल मांजू हे कर्नाटकातील हुबळी येथून नाकाबंदी तोडून राजस्थानच्या दिशेने निघाले होते. 

याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पथकासह पुणे-बंगळुरू महामार्गावरील किणी टोल नाक्यावर सापळा रचला होता. टोळीच्या म्होरक्याने सहायक पोलिस उपनिरीक्षक यादव यांच्या दिशेने गोळीबार केला होता. त्या हल्ल्यात सुदैवाने ते बचावले. त्याचवेळी प्रसंगावधान राखून निरीक्षक सावंत यांनी टोळीतील गुन्हेगारांवर गोळीबार करून दोघांना जखमी केले. त्यानंतर पोलिसांनी टोळीला अटक केली होती. निरीक्षक सावंत सध्या सांगली जिल्ह्यात कार्यरत आहेत, तर यादव कोल्हापूर पोलिस मुख्यालयात जिल्हा विशेष शाखेत कार्यरत आहेत.

Web Title: Police Inspector Tanaji Sawant, ASI Namdev Yadav awarded gallantry medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.