लाचखोरीत पोलिसांनी ‘महसूल’लाही टाकले पिछाडीवर, सर्वाधिक कारवाई जानेवारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 12:41 IST2022-06-10T12:40:38+5:302022-06-10T12:41:42+5:30
पाच महिन्यात तब्बल ११ जणावर लाचेच्या कारवाई झाल्या असल्या तरीही फक्त एकाच लाचखोराची संपत्ती गोठविण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे.

लाचखोरीत पोलिसांनी ‘महसूल’लाही टाकले पिछाडीवर, सर्वाधिक कारवाई जानेवारीत
तानाजी पोवार
कोल्हापूर : सरकारी कर्मचाऱ्यांची लाचखोरी नेहमीच जोमात असते. अक्षरश: सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणारेही लाच घेण्यात अग्रेसर असल्याचे कारवाईवरून स्पष्ट होते. कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी लाचखोरीत महसूल विभागाचा अव्वल नंबर लागतो. पण २०२२ या वर्षात पहिल्या पाच महिन्यातील कारवाईवरून महसूल विभाग मागे पडून तोच अव्वल नंबर लाचखोर पोलिसांनी पटकवल्याचे दिसून येत आहे.
पाच महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विविध विभागात लाचविरोधात एकूण ११ कारवाई केल्या. त्यामध्ये सहा पोलीस चार ठिकाणी झालेल्या कारवाईत ‘ट्रॅप’ झाले. आतापर्यत हजारापासून १० लाखापर्यत लाच घेतल्याची उदाहरणे आहेत.
लाचखोरीत पोलीस नंबर वन
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच पहिल्या पाच महिन्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. ‘एलसीबी’च्या दोघांना लाचखोरीच्या प्रकरणात ‘ट्रॅप’ करून वर्षारंभ झाला. त्यानंतर पाच महिन्यात सर्व विभागात एकूण ११ सापळे रचून कारवाई केली. त्यामध्ये एलसीबी, लक्ष्मीपुरी, गावभाग (इचलकरंजी) आदी चार ठिकाणच्या कारवाईत तब्बल ६ पोलीस गजाआड डांबले. त्यानंतर महसूल, आरोग्य, ग्रामविकास या विभागात प्रत्येकी दोन लाचेच्या कारवाई केल्या.
लाचखोरीच्या कारवाई
पोलीस : ०४
महसूल : ०२
आरोग्य : ०२
ग्रामविकास : ०२
वीज मंडळ : ०१
लाचखोरीचा विळखा
वर्षे : एकूण कारवाई संख्या
२०१९ : २६
२०२० : २७
२०२१ : २४
मे २०२२ पर्यत : ११
सर्वाधिक सापळे जानेवारीत
जिल्ह्यात सर्वाधिक ०३ इतके ‘लाचलुचपत’ विभागाचे सापळे हे जानेवारी महिन्यात लावले, ते सर्व यशस्वीही झाले. चालू वर्षातील पाच महिन्यात एकूण ११ कारवाई झाल्या असल्या तरीही गतवर्षी याच कालावधीतपर्यत फक्त सात कारवाई झाल्या होत्या.
फक्त एकाचीच गोठवली मालमत्ता
पाच महिन्यात तब्बल ११ जणावर लाचेच्या कारवाई झाल्या असल्या तरीही फक्त एकाच लाचखोराची संपत्ती गोठविण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे.
१६ जण अटक
तब्बल ११ कारवाईत एकूण १६ लाचखोरांना गजाआड डांबता आले. यामध्ये सहा पोलिसांचा समावेश आहे.
लाचखोरी ही समाजाला लागलेली कीड आहे, याविरोधात पाऊल उचलण्यासाठी तक्रारदारांनी तक्रारी करण्यासाठी पुढे यावे. टोल फ्री नं. १०६४ ला फोन करा, तक्रारदार ज्या ठिकाणी असेल तेथे ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागा’चा कर्मचारी पोहचून तक्रार घेईल. सापळा रचून लाचखोरांना गजाआडची हवा दाखवा. - आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर.