Kolhapur: लाचखोरीतील पोलिस संदेश शेटे स्वत:हून हजर; पंटर बिरांजे पोलिस कोठडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:26 IST2025-11-03T17:25:30+5:302025-11-03T17:26:42+5:30
वसुलीसाठीच छापेमारी?

Kolhapur: लाचखोरीतील पोलिस संदेश शेटे स्वत:हून हजर; पंटर बिरांजे पोलिस कोठडीत
कोल्हापूर : हुपरी येथील जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यानंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पसार झालेला पोलिस कॉन्स्टेबल संदेश आनंदा शेटे (वय ३५, रा. नरंदे, ता. हातकणंगले) हा रविवारी (दि. २) स्वत:हून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर झाला. या गुन्ह्यात शनिवारी (दि. १) अटक केलेला पंटर रणजित आनंदा बिरांजे (३८. रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) याची पोलिस कोठडीत रवानगी झाली. दरम्यान, आज, सोमवारी कॉन्स्टेबल शेटे याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
जुगार अड्ड्यावर छापा टाकून गुन्हा दाखल करण्याची भीती कॉन्स्टेबल शेटे याने जुगार अड्डाचालकास दाखवली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याने एक लाखाची मागणी केली होती. अखेर ७० हजारांवर तडजोड झाल्यानंतर पंटर रणजित बिरांजे याच्याकडे पैसे देण्याचे ठरले होते. मात्र, शनिवारी दुपारी पैसे घेताना बिरांजे रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला होता. कारवाईची कुणकुण लागताच कॉन्स्टेबल शेटे पळाला होता. पोलिसांनी शनिवारी सायंकाळी त्याच्या नरंदे येथील घराची झडतीही घेतली. मात्र, तो सापडला नव्हता. अखेर रविवारी सायंकाळी तो स्वत:हून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापुरातील कार्यालयात हजर झाला.
वसुलीसाठीच छापेमारी?
कॉन्स्टेबल शेटे आणि इतर दोन पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी जुगार अड्ड्यावर टाकलेला छापा ठरवून वसुलीसाठीच टाकल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळेच याची पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही आणि प्रभारी अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही. छापा टाकण्यासाठी गेलेल्या इतर दोन पोलिसांचीही चौकशी होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच शेटे याच्यावर आज निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली.