खाकी वर्दीचा धाक दाखवून पैशांची वाढली वसुली, पोलिसच बनत आहेत वर्दीतील खंडणीखोर
By उद्धव गोडसे | Updated: October 6, 2025 19:24 IST2025-10-06T19:23:30+5:302025-10-06T19:24:26+5:30
वाढत्या घटनांनी पोलिस दलाची प्रतिमा मलीन

खाकी वर्दीचा धाक दाखवून पैशांची वाढली वसुली, पोलिसच बनत आहेत वर्दीतील खंडणीखोर
उद्धव गोडसे
कोल्हापूर : एकीकडे वरिष्ठ पोलिस अधिकारी अवैध धंद्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेत असताना, दुसरीकडे काही पोलिस वर्दीचा धाक दाखवून खंडणीखोरी करीत आहेत. सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवरील मोक्काची कारवाई रद्द करण्याची ऑफर देण्यापर्यंत खंडणीखोर पोलिसांची मजल गेली आहे. अवैध धंद्यांना आश्रय देण्यापासून ते आपल्याच सहकाऱ्यांकडून बदलीसाठी पैसे उकळण्याचे प्रकार उघडकीस येत असल्याने पोलिसांची कार्यपद्धत चर्चेत आली आहे.
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' असे ब्रीद घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या पोलिस दलातील काही अपप्रवृत्ती पोलिस दलाची प्रतिमा मलीन करीत आहेत. खाकी वर्दीचा धाक दाखवून अवैध धंदेवाल्यांकडून हप्ते वसूल करणे, दाखल झालेल्या फिर्यादींमध्ये मदत करण्यासाठी गुन्हेगारांकडून पैसे घेणे, कारवाईत शिथिलता देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळणे, बदलीसाठी मदत करतो असे सांगून आपल्याच सहकाऱ्यांकडून पैसे घेण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
पोलिस अधीक्षकांनी अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना देऊनही काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळेच असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे काही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बदलीसाठी सहकाऱ्यांकडून वसुली
आंतरजिल्हा बदलीसाठी आस्थापना विभागातील कर्मचाऱ्याने चंदगड पोलिस ठाण्यातील अंमलदारांकडून प्रत्येकी ३० हजारांची लाच घेतली. यात शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील महिला कॉन्स्टेबलने मध्यस्थी करून पैसे स्वीकारले होते. त्याप्रकरणी पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
यात्रेच्या निमित्ताने व्यावसायिकांना गंडा
इस्पुर्ली पोलिस ठाण्यातील संपूर्ण डीबी पथक खंडणीच्या गुन्ह्यात अडकले होते. पोलिस ठाण्यातील आषाढी यात्रेच्या निमित्ताने त्यांनी परिसरातील व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.
मोक्का रद्दसाठी ६५ लाखांची मागणी
सोलापूर जिल्ह्यातील एका सराईत टोळीवरील मोक्काचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी तब्बल ६५ लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीत मुख्यालयाच्या पोलिसाचा सहभाग आढळला. या प्रकरणामुळे खाकी वर्दीतील खंडणीखोरी समोर आली. उजेडात न येणारी अशी अनेक प्रकरणे नेहमीच सुरू असतात, अशी चर्चा पोलिस दलात दबक्या आवाजात सुरू आहे.
घटना अनेक, प्रवृत्ती एकच
पोलिसांनी पैसे उकळल्याचे घटना वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची प्रवृत्ती एकच दिसते. खादी वर्दीचा धाक दाकवणे, त्याचा गैरवापर करणे आणि जास्तीत जास्त पैसे उकळणे एवढाच उद्देश खाकीतील खंडणीखोरांचा दिसतो. अशा प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिक कठोर बनावे लागणार आहे.