Kolhapur: विषबाधित मांस विक्रीसाठी ठेवले; चौघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:07 IST2025-11-07T18:06:30+5:302025-11-07T18:07:46+5:30
हा प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला

Kolhapur: विषबाधित मांस विक्रीसाठी ठेवले; चौघांविरोधात गुन्हा दाखल
नवे पारगाव / पेठवडगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथे २० बकऱ्यांना विषबाधा होऊन मृत्यू झाला. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या प्रकारात विषबाधा झालेले मांस विक्रीसाठी ठेवणाऱ्या चार जणांविरोधात वडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास एका इंडस्ट्रीजजवळील कुरण, सागर मटण शॉप (वाठार) व जनता मटण शॉप (अमृतनगर फाटा, पन्हाळा) येथे घडली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : सतीश सर्जेराव हिरवे (रा. अंबप) यांच्या २० बकऱ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाला होता. तरीदेखील त्यांनी हे मांस कापून विक्रीसाठी ठेवले. सुहास कोंडीबा हिरवे यांनी मध्यस्थी करून २ बकऱ्या सागर भोपळे (रा. वाठार. ता. हातकणंगले) यांना व ३ बकऱ्या जमीर ईलाही इनामदार (रा. शेटेमाळ कोडोली, ता. पन्हाळा) यांना विकल्या. हा प्रकार पोलिस तपासात स्पष्ट उघडकीस आला.
वडगावचे पोलिस कर्मचारी लखनराज सावंत यांनी घटनेची फिर्याद पोलिसात दिली आहे. आरोपींमध्ये सतीश सर्जेराव हिरवे (रा. अंबप, ता. हातकणंगले), सुहास कोंडिबा हिरवे (रा. अंबप), सागर सुभाष भोपळे (रा. वाठार, ता. हातकणंगले) व जमीर ईलाही इनामदार (रा. शेटेमळा कोडोली, ता. पन्हाळा) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यात चार मेंढ्या आणि एका बकऱ्याचा समावेश आहे. दरम्यान, संध्याकाळी घटनास्थळी पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाने भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डिगोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.