PM should extend crop insurance, farmers demand | प्रधानमंत्री पिक विमा मुदत वाढवून द्यावी, शेतकऱ्यांची मागणी

प्रधानमंत्री पिक विमा मुदत वाढवून द्यावी, शेतकऱ्यांची मागणी

ठळक मुद्देप्रधानमंत्री पिक विमा मुदत वाढवून द्यावी, शेतकऱ्यांची मागणीकोरोनाच्या भितीने पिक विमा नोंदणीत अडथळे

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड- कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव व लॉकडाऊनमुळे पिक विमा करण्यात अडथळे आल्याने व विमा मुदत संपल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांही शेतकरी बांधवानी ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी लावून धरली आहे.

एकिकडे पावसाने पाठ फिरवल्याने हातची पिके गेल्याचे चित्र सद्या दिसते आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रभाव व सततचे लॉकडाऊन यामुळे घराबाहेर पडणे जिकीरीचे झाले आहे.
दुष्काळ, पावसातील खंड, पूर यासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकांच्या सरासरी उत्पन्नात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.

अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे या उद्देशाने केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विमा कंपनी अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना विमा कवच देण्याचा प्रयत्न असतो. यासाठी पिक लागणीनंतर ठराविक मुदतीत पिक विमा भरण्याचे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात येते. यासाठी शासन व कृषी विभागाकडुन प्रबोधन करण्यात येते .

या वर्षीही रिलायन्स जनरल विमा कंपनीच्या सहकार्याने ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याची मुदत काल संपली. पण यावर्षी पावसाची अनियमितता प्रचंड वाढली आहे, गतसालच्या तुलनेत पाऊसही कमीच झाला. त्यामुळे पेरणी केलेली बहुतांशी पिके पावसाअभावी शेतातच वाळली.

दुष्काळ सदृश्य परस्थिती असताना शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याची गरज वाटते आहे. पण कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव व लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना घराबाहेर पडता आले नाही . व त्यातच ही विमा मुदत संपली. ही मुदत वाढवुन मिळावी ही मागणी जोर धरत आहे.

यावर्षी  २०८३ शेतकऱ्यांचा पिक विमा 

गतसाली ६८२ शेतकऱ्यांनी २९६ हेक्टर इतक्या क्षेत्रावरील भात, भुईमूग नाचणी इ. पिकाचा विमा उतरवला होता. पैकी ५८२ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती, तर यावर्षी  २०८३ शेतकऱ्यांनी ४७४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवला असे चित्र आहे.


गतसालच्या तुलनेत पिक विमा नोंदीचा आकडा जरी वाढला असला तरी पिक विमा नोंदणीसाठी दिलेली मुदत कमी आहे. मुदत वाढवून मिळाल्यास अजुनही जवळपास १५० हेक्टर क्षेत्राची वाढ होऊ शकते.
- ज्ञानदेव वाकुरे,
जिल्हा कृषी अधिकारी 

Web Title: PM should extend crop insurance, farmers demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.