कुटुंबातील एकालाच पीएम किसानचा लाभ, आजपासून हप्ता खात्यावर वर्ग होणार; कोल्हापूर जिल्ह्यात किती लाभार्थी..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:45 IST2025-01-20T16:45:07+5:302025-01-20T16:45:33+5:30

जुन्या खात्यांची तपासणी सुरू; लाभार्थींची संख्या कमी होणार

PM Kisan installment will be credited to the account from today More than five lakh beneficiaries in Kolhapur district | कुटुंबातील एकालाच पीएम किसानचा लाभ, आजपासून हप्ता खात्यावर वर्ग होणार; कोल्हापूर जिल्ह्यात किती लाभार्थी..वाचा

कुटुंबातील एकालाच पीएम किसानचा लाभ, आजपासून हप्ता खात्यावर वर्ग होणार; कोल्हापूर जिल्ह्यात किती लाभार्थी..वाचा

राजाराम लोंढे

कोल्हापूर : पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने डिसेंबर २०१८ मध्ये पीएम किसान योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून चार महिन्याला दोन हजार प्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. कोल्हापूर जिल्ह्यात साडेपाच लाखांहून अधिक लाभार्थी पहिल्या टप्प्यात होते; मात्र त्यातील ४ लाख ७६ हजार ७५१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला. त्यानंतर निकष डावलून काहीजण लाभ घेत असल्याचे सरकारच्या लक्षात आल्यानंतर छाननी केली. यामध्ये १३ हजार ४३७ लाभार्थ्यांना अपात्र ठरवले. त्यांच्याकडून १३ कोटी रकमेची वसुलीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली.

वारसा हक्काने जमीन येणाऱ्यांनाच लाभ

या योजनेवर होणारा खर्च पाहून केंद्र सरकारने योजनेवर मर्यादा आणण्यास सुरुवात केली आहे. सर्व निकषांची चाळण एकीकडे लावली जात असताना दुसऱ्या बाजूला २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या जमीनधारकांनाच लाभ मिळणार आहे; पण वारसा हक्काने जमीन नावावर असलेल्यांना लाभ दिला जाणार आहे.

कुटुंब म्हणजे काय?

एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पती, पत्नी व अठरा वर्षांखालील मुलगा ही कुटुंबाची व्याख्या आहे. अठरा वर्षांवरील मुलग्याच्या नावावर क्षेत्र असेल तर त्याला लाभ मिळणार आहे.

आजपासून हप्ता

पीएम किसान चा १९ वा हप्ता सोमवार (दि. २०) पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. तोपर्यंत नवीन निकषानुसार चाळण लावली जाणार आहे.

सततच्या ‘केवायसी’ डोकेदुखी

सरकार योजनेत पात्र राहण्यासाठी सतत ई-केवायसीची सक्ती करते. लाभार्थ्यांनी नोंदणी करतानाच सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली असते. तरीही सहा महिने-वर्षाला ‘ई केवासी’ पूर्तता करावी लागते.

दृष्टिक्षेपात पीएम किसान योजनेचे लाभार्थी

  • नोंदणी केलेले - ५ लाख ३७ हजार ०२१
  • पहिला हप्ता मिळालेले लाभार्थी - ४ लाख ७६ हजार ७५१
  • पहिल्या तपासणीत अपात्र - १३ हजार ४३७

Web Title: PM Kisan installment will be credited to the account from today More than five lakh beneficiaries in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.