IndiGo flight services disrupted: कोल्हापूर विमानतळावरील नियोजन कोलमडले, ३३ अधिकारी प्रवाशी सहा तास विमानातच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:15 IST2025-12-05T12:13:51+5:302025-12-05T12:15:52+5:30
विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना ड्रायफूट आणि कोल्ड्रिंक्स देऊन त्यांची व्यवस्था केली

संग्रहित छाया
कोल्हापूर : जागतिक पातळीवर एयरबस ३२० विमानातील आवश्यक साॅफ्टवेअर अपग्रेड व विमानतळ प्राधिकरणने केलेल्या नव्या नियमांच्या अंमलबजावणीमुळे देशभरातील इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाली. त्याचा परिणाम, कोल्हापूरविमानतळावरही गुरुवारी दिसून आला.
हैदराबाद-कोल्हापूर व बंगळूरू-कोल्हापूर या दोन विमानांना नियोजित वेळेपेक्षा उशीर झाल्याने प्रवाशांचे पुढील नियोजन कोलमडले. मात्र, विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना ड्रायफूट आणि कोल्ड्रिंक्स देऊन त्यांची व्यवस्था केली.
हैदराबादहून कोल्हापुरात येणारे विमान नियोजित वेळेपेक्षा तब्बल ४५ मिनिटे उशिरा लँड झाले. बंगळूरुहून कोल्हापूरला येणारे विमान २० मिनिटे उशिराने आले. हैदराबाद-कोल्हापूर या विमानात ६४ प्रवासी होते तर बंगळूरू-कोल्हापूर या विमानात ५६ प्रवासी होते. विमान उशिराने लँड झाल्याने प्रवाशांच्या पुढील नियोजनावर परिणाम झाला. विशेष म्हणजे आणखी १५ दिवस ही समस्या उद्भवणार असल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
कोल्हापूरचे ३३ प्रवासी ६ तास विमानातच
कृषी क्षेत्राशी निगडित असणाऱ्या एका कंपनीचे कोल्हापूर जिल्ह्यातील ३३ अधिकारी एका प्रशिक्षणासाठी दिल्लीला गेले होते. गुरुवारी दुपारी ११ :३० वाजता ते दिल्ली-पुणे या विमानात बसले. मात्र, तब्बल सहा तास या विमानाने उड्डाणच केले नाही. या काळात या प्रवाशांना चहा, नाष्टाही न दिल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे कोल्हापुरातील प्रवाशांनी झालेल्या त्रासाचा व्हिडिओ करत तो सोशल मीडियावर व्हायरल केला. सायंकाळी ६ वाजता या विमानाने उड्डाण केले.
विमानाचे लँड किंवा उड्डाण उशिरा होण्याची समस्या आणखी काही दिवस राहील. त्यामुळे प्रवाशांनी इंडिगोबरोबर संपर्क करून आपल्या आवश्यकतेनुसार हवा तो बदल करून घ्यावा. - अनिल शिंदे, संचालक, विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर.