कोल्हापुरात उद्यापासून पोलिस भरती, ८८ जागांसाठी किती उमेदवार आले, नियोजन कसे...वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:22 IST2026-02-12T16:21:08+5:302026-02-12T16:22:32+5:30
मॉर्निंग वॉकला परवानगी नाही

संग्रहित छाया
कोल्हापूर : जिल्हा पोलिस दलातील रिक्त ८८ जागांसाठी शुक्रवारपासून (दि. १३) शारीरिक चाचणीला सुरुवात होणार आहे. पोलिस परेड ग्राऊंड आणि राजाराम कारखाना चौक ते शिये पूल येथे होणाऱ्या शारीरिक चाचणीत सहा हजार ८५३ उमेदवार आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. २१ फेब्रुवारीपर्यंत शारीरिक चाचणी प्रक्रिया सुरू राहणार असून, बंदोबस्तासाठी ३०० पोलिस मैदानावर तैनात असतील, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.
राज्यात सुमारे १५ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याअंतर्गत कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातील रिक्त ८८ जागांसाठी शुक्रवारपासून शारीरिक चाचणी सुरू होईल. १३ ते २१ फेब्रुवारीदरम्यान रविवार (दि. १५) आणि गुरुवार (१९) शिवजयंती असल्याने प्रक्रिया बंद राहील. उर्वरित सात दिवसांत शारीरिक चाचणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे.
गर्दी टाळण्यासाठी रोज ७०० ते ११०० उमेदवारांना बोलावले जाणार आहे. सर्व उमेदवारांना त्यांचे वेळापत्रक ऑनलाईन पोहोचले आहे. रोज पहाटे पाच वाजता पोलिस परेड ग्राऊंडवर उमेदवारांना हजेरी लावावी लागणार आहे. कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ११ टेबलांची व्यवस्था केली आहे. छाती आणि उंचीचे मोजमाप झाल्यानंतर १६००, ८०० मीटर धावण्याची चाचणी होईल. त्यानंतर गोळाफेक आणि १०० मीटर धावण्याची चाचणी होईल.
रिक्त असलेल्या ८८ जागांसाठी एकूण सहा हजार ८५३ अर्ज आले आहेत. त्यात पाच हजार सात पुरुष, १६७२ महिला आणि १७४ माजी सैनिक उमेदवारांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांचे फेस रिडिंग घेतले जाईल. व्हिडिओ रेकॉर्डिंगसह रियल टाईम यंत्रणेचा वापर केला जाईल. पोलिस भरतीत कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी किंवा गैरप्रकार चालत नाहीत, असे आमिष कोणी दाखवत असल्यास तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.
असे आहे नियोजन
तारीख - उमेदवार
- १३ - ७००
- १४ - १०००
- १६ - ११२६
- १७ - ११०१
- १८ - १०८०
- २० - १००९ (८३५ महिला, १७४ माजी सैनिक)
- २१ - ८३७ (महिला)
स्टेरॉईड वापरल्यास गुन्हा दाखल होणार
शारीरिक चाचणीत काही उमेदवार प्रतिबंधित स्टेरॉईडचा वापर करतात. असे गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. लघुशंकेसाठी जाणाऱ्या उमेदवारांचीही कसून तपासणी केली जाईल. स्टेरॉईडचा वापर केल्याचे आढळताच संबंधित उमेदवारांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षकांनी दिला आहे.
मॉर्निंग वॉकला परवानगी नाही
पोलिस परेड ग्राऊंडवर मॉर्निंग वॉकसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. पोलिस भरती प्रक्रियेसाठी १३ ते २१ फेब्रुवारीदरम्यान मॉर्निंग वॉक आणि खेळांसाठी नागरिकांना परेड ग्राऊंडवर प्रवेश दिला जाणार नाही. पहाटे पाचपासून दुपारी बारापर्यंत उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. या काळात पोलिस अधीक्षक कार्यालय चौक ते पितळी गणपती मंदिरापर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.
असा असेल बंदोबस्त
- पोलिस अधीक्षक - १
- अपर पोलिस अधीक्षक - २
- उपअधीक्षक - ६
- पोलिस निरीक्षक - १२
- सपोनि, उपनिरीक्षक - २८
- अंमलदार - २७०